शिल्पा गार्डनमध्ये सुख योगाच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
चित्त थरारक योगा प्रात्यक्षिके सादर
अहमदनगर (प्रतिनिधी)- आत्मिक व शारीरिक बळ योग-प्राणायामाने मिळते. प्रत्येकाच्या जीवनात धावपळ व तणाव असून, या परिस्थितीमध्ये जो योग्य निर्णय घेऊन कृती करतो, तो जीवनात यशस्वी होतो. ऋषीमुनींच्या तपसाधनेतून योग, प्राणायाम व आयुर्वेद शास्त्र मानव जातीच्या कल्याणासाठी पुढे आले. हा ठेवा भारताने जगाला संपूर्ण जगाला दिला. पाश्चात्य संस्कृतीच्या आहार व जीवन पध्दतीने भारतीयांचे आरोग्य बिघडले असून, निरोगी व आनंदी जीवनासाठी योग-प्राणायाम करुन आपल्या संस्कृतीचा स्विकार करण्याचे आवाहन पद्मश्री पोपट पवार यांनी केले.
सक्कर चौक येथील शिल्पा गार्डनमध्ये सुख योगाच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन पद्मश्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंजु मुथ्था, निर्मल मुथ्था, अमित मुथ्था, मांडवा गावचे सरपंच जयदेव धुमाळ, योग गुरु सागर पवार, युवराज मुटकुळे, रावसाहेब मुटकुळे, सिताराम वीर, विनायक मुटकुळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे पद्मश्री पवार म्हणाले की, तरुण वयात मैदानावर खेळून, नियमीत योगा, व्यायामात सातत्य ठेवल्याने शरीर तंदुरुस्ती चांगली राहिली. त्यामुळे देशात हजारो कि.मी. चा प्रवास करता आला. आरोग्याच्या बळावर अनेक जबाबदार्या पार पाडता येत आहे. जीवनात पैश्यापेक्षा आरोग्याला किंमत असून, प्रत्येकाने आपले अरोग्य जपण्याचा सल्ला त्यांनी दिला.
संध्याकाळचा अल्हाददायक गारवा, निसर्गरम्य परिसर तर भजन संध्येने प्रफुल्लित झालेल्या वातावरणात सुख योगाचे उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गणपती बाप्पा मोरया… या गीताने भजन संध्येची सुरुवात झाली. विठ्ठला विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाने…. वातावरण भक्तीमय बनले होते. रंगलेल्या भजन कार्यक्रमास उपस्थित योग साधकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. योगा क्लासच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या चित्त थरारक योगा प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे फित कापून व दीपप्रज्वलनाने योगाच्या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाले.
प्रास्ताविकात योग गुरु सागर पवार यांनी योगाचे विविध प्रकार, योगात होत असलेला अद्यावत बदल व त्याचे फायदे याबद्दल माहिती दिली. डॉ. प्रफुल्ल चौधरी म्हणाले की, योग प्राणायामाने जीवनात मोठा बदल घडतो. योगाचे आरोग्यासाठी चांगले फायदे होत असून, कोरोना काळात याचा अनेकांनी अनुभव घेतला. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योगा करण्याचे त्यांनी सांगितले. ऋतूजा हेडा यांनी योगाने जीवन उत्साह पूर्ण बनले असून, एक वेगळा आनंद व ऊर्जादायी वातावरण निर्माण झाले. धावपळीच्या जीवनात समाधान व आनंद योगाने मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी किरण गायकवाड, मोहसीन सय्यद, सागर ढवण, गायत्री गार्डे, ऋतूजा हेडा, प्राची घुले, माधवी दांगट, अपर्णा धरम, श्रीराम दिवटे, पांडूरंग दातीर, निलेश हेडा, ऋतुजा हेडा, आशिष कुमार, कल्याणी चौधरी, महाजन, रासने, मयुरी चव्हाण, कविता कुमावत, प्रियंका चिखले, यशस्विनी ससे, मोक्षी बोरा, धनश्री गायकवाड, अंतून वारुळे, श्रेयश लगड, अक्षय शर्मा आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणाल कुलकर्णी व गिरीराज जाधव यांनी केले. आभार गायत्री गार्डे यांनी मानले.