भिंगारला रस्ता कॉक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासाठी 1972 साली पहिली पाणीयोजना झाली, त्यानंतर सध्या अमृत पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेचे दहा टक्के काम शिल्लक असून, या योजनेद्वारे वसंत टेकडीला पाणी आल्यावर अधिकचे पाणी भिंगारला देऊन येथील नागरिकांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडविण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तसेच भिंगार छावणीचे इतर प्रश्न देखील सोडविण्यास प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार संग्राम जगताप यांच्या विकास निधीतून भिंगार येथील कुंभार गल्ली व धनगर गल्ली परिसरातील रस्ता कॉक्रिटीकरण आणि पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाच्या भूमीपूजनप्रसंगी आमदार जगताप बोलत होते. परिसरातील ज्येष्ठ महिला सुशिला कापसे यांच्या हस्ते या कामाचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, भिंगार कॅन्टोमेंटचे सदस्य वसंत राठोड, शिवम भंडारी, पै. सदाशिव भंडारी, शिवाजी भांड, विनायक देवतरसे, राजेंद्र भंडारी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अमित खामकर, संभाजी पवार, संतोष ढाकणे, अशोक राहिंज, सुदाम देवतरसे, सुदाम मोरे, अभिजीत सपकाळ, पांडुरंग देवतरसे, ईश्वर भंडारी, संजय भंडारी, कलावती राहिंज, निर्मला देवतरसे, अलका भंडारी, मिनाताई मोरे, सुरेखा लांडगे, गोरख वाघस्कर, अजिंक्य भिंगारदिवे, विशाल बेलपवार, मतिन शेख, अक्षय भांड, ईश्वर बेरड, दिपक लिपाने, सुदाम गांधले, संजय खताडे, कमलेश राऊत, मतिन सय्यद, संपत बेरड, दीपक राहिंज, नवनाथ मोरे, गणेश शिंदे, संतोष हजारे, ओंकार फिरोदे, अक्षय नागापूरे, सागर चवंडके आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की, कॅन्टोन्मेंट बोर्ड असल्याने भिंगारच्या विकासाला चालना देण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. लष्करी अधिकार्यांना भेटून अनेक विकासकामे मार्गी लावले. भुईकोट किल्ल्याचा विकास करण्यासाठी 5 कोटी रुपयाचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. भुईकोट किल्ला राज्य पर्यटन विभागाच्या अखत्यारीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यामुळे पर्यटनाला विकास मिळून अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात शिवम भंडारी म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून भिंगारचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. उपनगरांचा विकास साधत असताना, भिंगारला देखील त्यांच्या निधीतून भरीव कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी शहराला विकासाचे रुप देऊन बदल घडविण्याचे कार्य आमदार संग्राम जगताप करीत असून, भिंगारला देखील त्यांनी भरीव निधी दिल्याचे सांगितले.
वसंत राठोड म्हणाले की, कॅन्टोन्मेंट बोर्ड असलेल्या भिंगार शहराला आमदारांनी निधी उपलब्ध करून दिल्याने विकासात्मक चित्र निर्माण झाले आहे. शिवम भंडारी यांनी नागरिकांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सातत्याने त्यांच्याकडे पाठपुरावा केला. विकासासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून, भिंगारच्या विकासासाठी सर्व एकत्र येऊन कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. संजय सपकाळ म्हणाले की, भिंगारचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. पंचवीस वर्षात पूर्वी जे काम झाले नाही, ते काम अवघ्या सात-आठ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी करून दाखविले. भुईकोट किल्ल्याच्या विकासासाठी भरीव निधी आणून पर्यटनाला चालना देण्याचे काम त्यांनी केले असून, याचा फायदा भिंगारकरांना होणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ आढाव यांनी केले. आभार दिपक राहिंज यांनी मानले.