बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात निशुल्क हरित कौशल्य विकास (जीएसडीपी) कार्यशाळेचा समारोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक भावनेने अपारंपरिक ऊर्जेचा वापर काळाची गरज बनली आहे. या ऊर्जेचा वापर करुन राष्ट्रहितासाठी योगदान द्यावे लागणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामीण भागातील वाडी-वस्तीवर आजही वीज पोहचलेली नाही. एमआयडीसीला चोवीस तास वीज तर शेतकर्यांना मात्र त्यांच्या वेळेत दिवसाला आठ तास वीजही देता येत नाही, हे व्यवस्थेचे मोठे अपयश आहे. महाराष्ट्रात कोळसा नसल्याने वीज संकट निर्माण झाले व भारनियमन ओढवले गेले आहे. या सर्व बाबींकडे पाहून अपारंपारिक ऊर्जेकडे वळून बदल व विकास घडवावा लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी केले.
बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, मिनिस्ट्री ऑफ इन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज, स्थित एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी), भारतीय विकास ट्रस्ट (बीव्हीटी) व मंडळ मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांसाठी एका महिन्याची निशुल्क हरित कौशल्य विकास (जीएसडीपी) कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी लंके बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टेरीचे पदाधिकारी पल्लवी शुक्ला, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज दिअॅब्रिओ, सेल्कोचे शेखर शेट्टी, संतोष कुमार, मंडला सोल्युशनचे संदीप कामत, जॉय डॅनियल, भारत विकास ट्रस्टचे मनोहर कारेगिरी आदींसह प्रशिक्षणार्थी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे लंके म्हणाले की, सौर, पवन आदी निसर्गातील अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे. ही अपारंपारिक नसून पारंपारिक ऊर्जाच आहे. प्राचीन काळापासून याचा वापर होत आलेला आहे. सोलर ऊर्जेचे तांत्रिक प्रशिक्षण घेऊन युवकांनी बदल घडविण्यासाठी सामाजिक योगदान या भावनेने कार्य करावे. समाज तंत्रज्ञान स्वीकारण्यास तयार असून, नवीन तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे. जीवनात आनंद व आरोग्य निसर्गाच्या सानिध्यात कसे जगता? यावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. तर आंध्रप्रदेश व यल्लामाच्या सिमेवर असलेल्या जंगलात आदिवासी बांधव सौर ऊर्जेचा वापर उत्तमपणे करत असल्याचे उदाहरण त्यांनी दिले.
बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात झालेल्या कार्यक्रमात सौर प्रकल्पावरील विद्युत बल्ब प्रज्वलीत करुन व प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थी युवकांना प्रमाणपत्र व टूल किटचे वितरण करण्यात आले. जॉय डॅनियल म्हणाले की, प्रत्येक प्रशिक्षणार्थी युवक आपल्या गावी गेल्यावर ग्रामस्थांना सौर उर्जेचे महत्व पटवून सांगणार आहे. पारंपरिक ऊर्जा कोळसा, पेट्रोल, डिझेल आदी संपणारी गोष्ट असून, सौर ऊर्जा व पवन ऊर्जा इतर अपारंपारिक ऊर्जा चिरकाल टिकणारी गोष्ट असून त्याचा वापर होणे आवश्यक आहे. त्याचे नियोजन आत्तापासून करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संतोष कुमार यांनी एक महिन्याचे टेक्निकल ट्रेनिंग घेऊन युवावर्ग भविष्यातील आव्हान पेळण्यासाठी सक्षम झाला आहे. युवकांनी हरित ऊर्जेसाठी योगदान द्यावे लागणार असल्याचे सांगून, जीवनात जगण्यासाठी, ओळख निर्माण करण्यासाठी व ओळख टिकण्यासाठी संघर्ष करण्याचे सांगितले.
पल्लवी शुक्ला म्हणाल्या की, अपारंपारिक उर्जेच्या वापरासाठी युवकांना मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. पारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत संपत असताना बदलाचे वारे वाहू लागले आहे. बदलत्या प्रवाहात येऊन युवकांनी विकास साधावा. भविष्यात अपारंपरिक ऊर्जेशिवाय पर्याय नसून, याबाबत युवकांनी जनजागृती करण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थी युवकांनी सोनेवाडी (ता. नगर) गावात पथनाट्यातून अपारंपारिक ऊर्जेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कांतीलाल पाटोळे यांनी केले. आभार फादर जॉर्ज यांनी मानले. आंम्ही समाज बांधतो, या सामुदायिक गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.