केडगावच्या जगदंबा माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात
नृत्याविष्कारातून राष्ट्रीय एकात्मचे दर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान आत्मसात करावे. ज्ञानाने सन्मान मिळतो. पैश्याने पैसा मिळत नाही, पैसे कमविण्यासाठी देखील ज्ञान, कौशल्य लागते. ज्ञान व कौशल्याने कोणत्याही क्षेत्रात प्रगती करता येऊ शकते. स्वत:मध्ये क्षमता व गुणवत्ता असल्यास बिकट परिस्थिती अडचण ठरत नाही. फक्त स्वत:वर विश्वास असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी केले.
केडगाव येथील भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीच्या जगदंबा माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोडखे बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे, संचालिका वैशालीताई कोतकर, नगरसेवक मनोज कोतकर, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, प्रा. हबीब शेख आदींसह आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग दरेकर यांनी प्रास्ताविकात सर्वसामान्य वर्गातील मुलांना घडविण्याचे कार्य जगदंबा विद्यालय करीत आहे. कोरोना काळातही बिकट परिस्थितीवर मात करुन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे ध्येय अविरत सुरु ठेवण्यात आले. विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिध्द केली असल्याचे त्यांनी सांगितले.
वैशालीताई कोतकर यांनी स्वतःचे क्षेत्र स्वतः निवडा व त्या क्षेत्रात स्वतःला झोकून आपले अस्तित्व निर्माण करण्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत आणि विभागीय, जिल्हास्तरावर चमकलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी देशभक्ती व देशातील विविध संस्कृतीचे दर्शन घडविणार्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. प्रदुषण व सार्वजनिक स्वच्छते सारख्या सामाजिक विषयांवर जागृती केली. या विद्यार्थांच्या कला गुणांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पहाण्यासाठी पालकांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता कांबळे यांनी केले. आभार अशोक हराळ यांनी मानले.
