संवाद कार्यक्रमातून उलगडला कर्तृत्वमय जीवनाचा प्रवास
प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेळवणारी महिला खर्या अर्थाने कर्तृत्ववान -अॅड. शर्मिला गायकवाड
अहमदनगर (प्रतिनिधी)- आजच्या युगातील प्रगती म्हणजे स्त्री होय. प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवून महिला प्रगतीसाठी मोठे योगदान देत आहेत. प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पेळवणारी महिला खर्या अर्थाने कर्तृत्ववान आहे. कुटुंबातील विविध जबाबदार्या पार पाडून माहेर आणि सासर दोन कुटुंबाला प्रकाशमान करणारी स्त्री आहे. सातत्याने धडपड करणारी महिला ही प्रत्येक कुटुंबाचा आधारस्तंभच असल्याचे प्रतिपादन अॅड. शर्मिला गायकवाड यांनी केले.
सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी अॅड. गायकवाड बोलत होत्या. संस्थेचे सचिव ना.म. साठे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड. रियाज बेग म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. कर्तृत्ववान महिलांच्या यशोमय जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पंण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या महिला दिनाच्या कार्यक्रमात प्रा. अनुजा अब्दुले, अॅड. गायकवाड, अॅड. अर्चना तरडे, डॉ. नजमा जहीर, अॅड. पी.के. उजागरे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कर्तृत्ववान महिलांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधला.
प्रा. अनुजा अब्दुले म्हणाल्या की, स्त्रीला निर्णय घेण्याचा अधिकार अजूनही नाही, ही खेदाची बाब आहे. महिलांना स्वत:चे निर्णय स्वत: घेता आले पाहिजे. महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यास त्यांना स्वत:चे अस्तित्व निर्माण करता येणार असल्याचे स्पष्ट केले.

संस्थेचे सचिव ना.म. साठे म्हणाले की, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. महिलांना दुय्यम स्थान न देता, समान वागणुक दिल्यास समाजाची प्रगती साधली जाणार आहे. शेतातील मजुरी करण्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी उंच भरारी घेतली आहे. स्त्रियांच्या सन्मानाची सुरुवात स्वत:च्या घरापासून करण्याचे त्यांनी आवाहन केले.यावेळी डॉ. नजमा, अॅड. तरडे, अॅड. उजागरे, प्राध्यापिका मीरा जानराव, विद्यार्थी प्रतिनिधी लीना कोळपकर, प्रसाद पाटसकर, सचिन जगधने यांनी आपल्या भाषणात महिला शक्तीचे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी ताकवले हिने केले. आभार जबीन शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल राठोड, सविता तांबे, विनोद जाधव, सतीश थोरात आदींसह महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
