शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या हस्ते चादर अर्पणाचा कार्यक्रम
नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक सलोखा व धार्मिक ऐक्याचा संदेश देत ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या 533 व्या स्थापना दिनानिमित्त रविवारी (28 मे) सकाळी 9:30 वाजता शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या बागरोजा येथील कबरीवर सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या हस्ते चादर अर्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये मशाल प्रज्वलीत करुन एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे. हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी सर्व नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहराच्या वैभवशाली इतिहास जाणून घेण्यासाठी व शहर वसविणार्या राजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी शहराच्या स्थापना दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असतो. या कार्यक्रमात शहराच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.