रायगड व परभणी जिल्ह्यावर मिळवला विजय
अहमदनगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडियन फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनिअर अंतर जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करुन रायगड व परभणी जिल्ह्याचा पराभव केला. तर आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन उपांत्यपूर्व फेरी पर्यंत मजल मारली आहे.
शिरपूर जि. धुळे येथे सब ज्युनिअर अंतर जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला असून, यामध्ये सर्व जिल्ह्यातील संघ सहभागी झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्याचा पहिला सामना रायगडशी अत्यंत अटीतटीचा झाला. यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 गोल केले. बरोबरीत सामना झाल्यावर पेनल्टीवर 4-3 गोलने अहमदनगरने रायगडवर विजय मिळवला.

तर दुसरा सामना परभणी संघाबरोबर झाला. यामध्ये अहमदनगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 10-0 गोलने एकतर्फी विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. दुसर्या दिवशी अहमदनगरचा मुंबई संघाबरोबर झालेल्या प्रेक्षणीय सामन्यात अहमदनगरला पराभव स्विकारावा लागला. अहमदनगर जिल्ह्याच्या संघात कर्णधार कृष्णा टेमकर, उपकर्णधार आदित्य गुगळे, वंश छल्लाणी, सिद्धांत गांधी, जैद शेख, श्वेतांत जाधव, कार्तिक चव्हाण, शुभमकर सावंत, युनूस सय्यद, वीर छल्लाणी, विश्वदीप निंबाळकर, विराज चव्हाण, धैर्य कालपुंड, वीरेन क्षेत्रे, अन्वेष ठाकूर, कुणाल दांगट, सिद्धेश्वर देशमुख, जोएल पाथरे यांचा समावेश होता.

उपांत्यपूर्व फेरी गाठलेल्या अहमदनगर संघातील खेळाडूंचे अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, जोगासिंहजी मीन्हास, खालीद सय्यद, राणा परमार, सचिव गॉडवीन डिक, सहसचिव गोपीचंद परदेशी, रौनप फर्नांडीस यांनी अभिनंदन केले. संघ व्यवस्थापक म्हणून रॉबिन आंग्रे यांनी काम पाहिले.