कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतरांच्या एकजुटीच्या घोषणा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी जादा तासिका घेण्याचा निर्णय
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सुरु असलेला सरकारी कर्मचार्यांचा संप सातव्या दिवशी राज्य शासनासोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर मिटल्याने न्यु आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर सोमवारी (दि.20 मार्च) संध्याकाळी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने विजयी जल्लोष करण्यात आला. कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतरांच्या एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या. हा यश सर्वांच्या एकजुटीच्या असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. तर सात दिवसाच्या संप काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी जादा तासिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या जल्लोषात जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, प्राथमिक शिक्षक संघाचे बापूसाहेब तांबे, कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक रावसाहेब निमसे, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर, शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, खाजगी प्राथमिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरूमुडे, प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, शिक्षकेतर संघटनेचे गोवर्धन पांडुळे, भानुदास दळवी, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे सचिव संतोष कानडे, राजेंद्र जाधव, नंदकुमार शितोळे, रविंद्र वर्पे, शेखर उंडे, अन्सार शेख, भाऊसाहेब थोटे, नंदू हंबर्डे आदींसह शिक्षक व महिला शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
राज्य शासनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा समितीचे संयोजक विश्वास काटकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्य सरकारी कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाची सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मकता दाखवली असून राज्यात जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल, असा दावा काटकर यांनी केला. तसे लेखी आश्वासन सरकारने दिल्याचंही काटकर यांनी सांगितल्याने अहमदनगर शहरात संप स्थगित करुन संध्याकाळी जल्लोष करण्यात आला.