नवीन चार श्रमिक कोड कायद्याच्या विरोधात घोषणा
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगरला विडी कामगारांच्या उपस्थितीमध्ये कामगार दिवस साजरा करण्यात आला. श्रमिक हाऊसिंग सोसायटी, लालबावटा विडी कामगार युनियन व आयटक संघटनेच्या वतीने कामगार चळवळीचा प्रतिक असलेला लाल झेंडा फडकविण्यात आला. तर केंद्र सरकारने कामगारांवर लादू पाहत असलेल्या नवीन चार श्रमिक कोड कायद्याला तीव्र विरोध करण्यात आला.
श्रमिक हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन विलास सग्गम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयटक कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अॅड. सुधीर टोकेकर, विडी कामगार संघटनेच्या उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, नारायण यन्नम, अशोक इप्पलपेल्ली, सचिव शंकर येमूल, किसनराव बोमादंडी, संगीता कोंडा, सगुणा श्रीमल, शोभा पासकंटी, निर्मला न्यालपेल्ली, मार्कंडेय शाळेच्या मुख्याध्यापीका विद्या दगडे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कॉ. अॅड. सुधीर टोकेकर म्हणाले की, मोठ्या संघर्षानंतर कामगारांनी आपला हक्क मिळवला आहे. महिला-पुरुष कामगारांमधील भेदभाव नाहिसा झाला. पूर्वी भांडवलदार वर्ग कामगारांना गुलामासारखे राबवत होते. मात्र कामगार कायद्यासाठी मोठा उठाव करावा लागला. सध्याच्या सरकारने 44 कायद्याचे रूपांतर चार श्रमिक कायद्यामध्ये करून करून कामगारांच्या हितावर गडांतर आणले आहे. हे भांडवलदाराच्या हिताचे कायदे असून, या कायद्यामुळे कामगार कायम होणार नाही. मालक वर्गाने कामगारांशी पाच वर्षाचा करार केला तर त्याला तो कधीही काढू शकतो. मात्र पाच वर्षे तो त्याच्याकडून काम करून घेऊन त्याला तो कामावरून कमी करू शकतो. कामगारांना कामाची शाश्वती राहिलेली नाही. सरकारला हा कायदा लागू करून भांडवलदाराचे हित जपायचे आहे. म्हणून आयटकने या कामगार कोडला विरोध केलेला असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. भारती न्यालपेल्ली म्हणाल्या की, कामगार दिवस हा सर्व कामगार आपल्या हक्कासाठी एकजुट होण्याचा संदेश देत आहे. कामगार दिनाचा हा प्रदीर्घ इतिहास लक्षात घेताना घटत चाललेला रोजगार आणि वाढत चाललेली महागाई याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. आज अर्थव्यवस्था केवळ भांडवलदार केंद्रीत बनली आहे. कामगार संघटनांना विश्वासात न घेता 4 श्रम कोड तयार करून कामगार वर्गाचे शोषण सध्या सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
विलास सग्गम यांनी आयटी क्षेत्रामध्ये कामाचे तास राहिलेले नाही.मात्र आता जगातील कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले कामाचे 8 तास आता कधी 12 व 14 तास झालेले आहे. हे आपल्याला कळलेले सुद्धा नाही. हे सर्व भांडवलदारांच्या हितासाठी सरकार करत आहे. श्रमातून संपत्ती निर्माण करणार्या कामगार वर्गाने अधिकाधिक सजग होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ विडी कामगार महिलांचा सत्कार करुन उपस्थितांचा महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.