दिव्यांग व्यक्तीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
आरोपींवर दिव्यांग अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमीनीवर अतिक्रमण करुन बळकाविण्याच्या उद्देशाने कुटुंबीयांवर दहशत माजविणार्यावर दिव्यांग अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्याची तक्रार दिव्यांग असलेले अशोक पाराजी लांडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अशोक पाराजी लांडे हे दिव्यांग असून, ते पत्नी व मुलाच्या सहाय्याने निंबळक (ता. नगर) येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. मात्र शेजारी राहणार्या व्यक्तीची शेतजमीन एकमेकास लागून आहे. लांडे दिव्यांग असल्याचा फायदा घेऊन समोरच्या व्यक्तीने त्यांच्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सदर जमीनीचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असून, रात्री-अपरात्री घरावर दगडफेक करुन कुटुंबीयांमध्ये दहशत निर्माण करत आहे. कुटुंबीयांना त्रास देण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी करुन मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोप लांडे यांनी केला आहे.
13 मार्च रोजी चार ते पाच गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन येऊन सदरील व्यक्तीन कुटुंबीयांना अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या व्यक्तींपासून कुटुंबायांना धोका निर्माण झाला असून, दिव्यांग व्यक्तीला धमकी देणे, हिंसक वागणूक व छळ करणे याबाबत गुन्हा दाखल करावा व अॅट्रॉसिटीचे कलम लावण्याची मागणी लांडे यांनी केली आहे.