सर्व शिक्षक संघटना संपात एकवटल्या
हजारोंच्या संख्येने शिक्षक बांधव व महिला शिक्षिकांचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी (दि.14 मार्च) धडक मोर्चा काढण्यात आला. सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांनी एकजुटीन या मोर्चात सहभाग नोंदवला.
जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने शिक्षक बांधव व महिला शिक्षिका यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिरीष टेकाडे, शिक्षक भारतीचे आप्पासाहेब जगताप, बाबासाहेब बोडखे, प्राथमिकचे शिक्षक संघटनेचे बापूसाहेब तांबे, संजय कळमकर, वैभव सांगळे, शेखर उंडे, अन्सार शेख, महेश पाडेकर, सखाराम गारुडकर, शरद दळवी, अमोद नलगे, भिमाशंकर तोरमल, भानुदास दळवी, राजू पवार, रविंद्र गावडे, रुपाली कुरुमकर यांनी केले.

शहरातील गुलमोहर रोडवरील आनंद विद्यालयाच्या मैदानात शहरासह जिल्ह्यातील शिक्षक एकत्र आले होते. गुलमोहर रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शिक्षकांनी शिस्तबध्द पध्दतीने मोर्चाचे नियोजन केले होते. महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. आंदोलक शिक्षकांनी डोक्यावर जुनी पेन्शनच्या गांधी टोप्या परिधान केल्या होत्या. आंदोलकांनी जुनी पेन्शन व शिक्षकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडलेल्या या मोर्चाचे समन्वय समितीच्या आंदोलनात समावेश झाला. मोठ्या संख्येने जमलेल्या शिक्षक आंदोलकांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता देखील काही काळ बंद होता. यावेळी शिक्षक व सरकारी कर्मचारींच्या जुनी पेन्शनच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या. तर प्रमुख पदाधिकार्यांनी आपल्या भाषणात जुनी पेन्शनची मागणी करुन, शासनाच्या शैक्षणिक व कर्मचारी धोरणावर तीव्र शब्दात टिका केली.

जुनी पेन्शन व जिव्हाळ्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महापालिका नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायत कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या बेमुदत संपात सहभागी होण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. काम बंद ठेऊन शिक्षक या संपात उतरले असून, सर्व शिक्षक संघटना जुन्या पेन्शनसाठी एकवटल्या आहेत.

या मोर्चात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटन, आदर्श बहुजन शिक्षक संघ (इब्टा), महाराष्ट्र राज्य ग्रेडपात्र मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अपंग कर्मचारी संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, अहमदनगर जिल्हा शिक्षक परिषद, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, एकल शिक्षक मंच या सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
