• Fri. Sep 19th, 2025

शहरात दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत करियर मार्गदर्शन

ByMirror

May 29, 2023

कॉमर्स क्षेत्रात उपलब्ध शैक्षणिक व करियरच्या संधीची दिली माहिती

जगातील सर्वाधिक लोकसंख्या व विकसनशील भारतामध्ये कॉमर्समध्ये करियरची मोठी संधी -सी.ए. उमेश दोडेजा

अहमदनगर (प्रतिनिधी)- जगातील सर्वाधिक लोकसंख्या व विकासाकडे वाटचाल करणार्‍या भारत देशातील विद्यार्थ्यांना कॉमर्समध्ये करियरची मोठी संधी आहे. सध्याच्या परिस्थितीत भारतात 3 लाख 50 हजार सीए असून, भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनाने ही आकडेवारी अत्यंत कमी असून, दहावीनंतर कॉमर्सच्या विविध शाखेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे करियर घडविता येऊ शकते, असे प्रतिपादन सी.ए. उमेश दोडेजा यांनी केले.


शहरात अपराइज ट्युटोरियलच्या वतीने मोफत करियर गाईडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दहावीनंतर पुढे कॉमर्स क्षेत्रात उपलब्ध शैक्षणिक व करियरच्या संधीबद्दल मार्गदर्शन करताना सी.ए. दोडेजा बोलत होते. अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलच्या ऑडिटोरियम मध्ये झालेल्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


पुढे सी.ए. दोडेजा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कॉमर्स मध्ये का यावे? आणि कॉमर्स क्षेत्रात भविष्यातील संधी जाणून घेण्याची गरज आहे. एमबीए, बीबीए या सारख्या खर्चिक कोर्समध्ये ज्या महाविद्यालयात शिकला त्यानुसार त्याला प्लेसमेंट मिळते. मात्र कोणत्याही महाविद्यालयातून सीए झालेला विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला किंमत असते. एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षाप्रमाणे सीएच्या परीक्षा अवघड असतात. निकालाची टक्केवारी देखील कमी असल्याचे त्यांनी सांगितले. तर सीए, सीजे, सीएमए या कोर्सची माहिती परीक्षेचा काळावधी व यामधील करियरच्या संधीची त्यांनी सविस्तर माहिती दिली.


सी.ए. यश डागा यांनी दहावीनंतर कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊन देशात व परदेशात करियरच्या अनेक चांगल्या संधी विशद करुन परदेशात असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सीपीए, सीएफए, एसीसीए, एफआरएम या कॉमर्स क्षेत्रातील कोर्सची प्रवेश प्रक्रिया व अभ्यासक्रमाची माहिती दिली. अ‍ॅड. निकिता मुथा यांनी एल.एल.बी. व एल.एल.एम संदर्भात मार्गदर्शन केले. प्रा. प्रज्ञा मुनोत यांनी कॉमर्समध्ये मॅथ्स हा विषय ऑपशनल असला तरी, त्याचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी सी. ए. चिराग कासवा, वैभव कासवा आदी तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते. या उपक्रमासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संस्थेचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *