महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय अजेंड्यावर घेण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रस्ते खड्डेमुक्त होण्यासाठी नवीन झालेल्या शहरातील उड्डाणपूल व कल्याण रोडवरील बायपास येथे पथकर लावून जमा झालेला महसुल शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी वापरण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी केली आहे.
हा विषय शुक्रवारी होणार्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावर घेऊन सर्व नगरसेवकांनी जनतेच्या हितासाठी मंजूरी देण्याचे त्यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

शहरात सक्कर चौक ते अशोका हॉटेल पर्यंत नवीन उड्डाणपूल झाले आहे. त्याचे उद्घाटन देखील झाले असून वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला आहे. या पुलावरुन व शहरालगत असलेल्या रस्त्यांचा वापर करुन वाहने चारचाकी वाहने जात आहे. सध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याचे अधिकार्यांचे म्हणने आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचे कामे देखील रखडले असून, अनेक रस्त्यांची बिकट अवस्था आहे. या खड्डेमय रस्त्यांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील काही रस्त्यांवर थोडीफार डागडूजी करण्यात आली आहे.

30 जून 2003 ला महापालिका झाली आहे. महापालिकेला 18 ते 19 वर्षे होऊनही शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढून तो शहरातील रस्त्यांचे कामे होण्यासाठी नवीन उड्डाणपूल व कल्याण रोडवरील बायपास येथे इतर जिल्हे व राज्यातून येणार्या चारचाकी वाहनांकडून पथकर वसुल केल्यास महापालिकेच्या महसुलात वाढ होणार आहे. तर हा जमा झालेला महसुल फक्त शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरल्यास शहर खड्डेमुक्त होणार असल्याचे दीप चव्हाण यांनी म्हंटले आहे.

