सर्व सरकारी कर्मचार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना (महाराष्ट्र) अहमदनगर शाखेच्या जिल्हा कार्यकारणीच्या वतीने शनिवार दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता सावेडी लक्ष्मी उद्यान जवळील कृषी कार्यालयाच्या प्रांगणात एन.पी.एस. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात सर्व शासकीय कर्मचारी बंधू-भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुभाष तळेकर व सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी केले आहे. यामध्ये नवीन अंशदायी पेन्शन योजना (एन.पी.एस.) भविष्यात अडचणींची कशी ठरणार? याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
मध्यवर्ती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यामध्ये मध्यवर्ती संघटनेने 25 डिसेंबर 2022 रोजी राज्य पातळीवरील पदाधिकार्यांची बैठक घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवसापासून सर्वांना जुनी पेन्शन मिळावी म्हणून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन अंशदायी पेन्शन योजना (एन.पी.एस.) भविष्यात अडचणींची ठरणार आहे. यावर मध्यवर्ती संघटना महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष गणेश देशमुख व प्रदेश उपाध्यक्ष संजय पाटील हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.