दहावीच्या विद्यार्थ्यांनी ई लर्निंगसाठी शाळेला दिली 32 इंची एलईडी टीव्हीची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोदर विधाते (मास्तर) विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एसएससी बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. गुरुवार (दि.2 मार्च) पासून परीक्षा केंद्रावर एसएससी बोर्डाच्या परीक्षा सुरु होत आहे.
या पार्श्वभूमीवर शाळेत घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक शुभम पंधाडे यांच्यासह संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, माध्यमिकचे मुख्याध्यापक एस.बी. सुसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शुभम पंधाडे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन, स्पर्धा परीक्षेतील विविध संधीची माहिती देऊन शिक्षणाने जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग सांगितला. एस.एम. बर्डे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ई लर्निंग क्लाससाठी 32 इंची एलईडीटीव्ही भेट दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. आर. मेहत्रे यांनी केले. प्रस्ताविक एस.पी. गायकवाड यांनी केले. आभार बी.एस. पुंड यांनी मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.