राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत पटकाविले स्थान
सुरभी शिवाजी मोकशे राज्यात नववी
अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी शाळेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा या वर्षीही कायम राखली असून, राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे.
इयत्ता 5 वी च्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 7 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यामध्ये सुरभी शिवाजी मोकशे हिने राज्यात नववे स्थान पटकविले आहे. तर आयुष रविंद्र फाटक, सत्यजित संजय नाबगे, कौस्तुभ अनिल तोरकड, प्रथमेश संतोष जाधव, यश अनिल मोरे, गौरव ज्योतीराम फरतडे यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
इयत्ता 8 वी च्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अद्वैत विवेक गहाणडुले, मयूर शंकर पवार, आश्लेषा विवेक गहाणडुले व रोहित एकनाथ दळवी या चार विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तसेच नॅशनल स्कॉलर सर्च एक्झामिनेशन मध्ये सौम्या रामभाऊ देशमुख, स्वरा अजय भद्रे यांनी राज्यात पाचवा तर सिध्दवेदाय सचिन पेंडभाजे याने नववा क्रमांक पटकाविला आहे. तर स्वराज संतोष रोहोकले यांने देखील यश मिळवले आहे.

या गुणवंत विद्यार्थ्यांचा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, शाळेच्या माजी विद्यार्थिनी तथा पारनेर दामिनी पथकाच्या अध्यक्षा रोहिणी वाघमारे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, अर्जुन पोकळे, विभागीय अधिकारी टी.पी. कन्हेरकर, सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळूंजकर, शिवाजीराव तापकीर, प्राथमिक विदयालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, प्रभारी मुख्याध्यापक महादेव भद्रे आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके म्हणाले की, शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत असताना संस्काराची देखील जोड दिली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातून देखील विद्यार्थी या शाळेत येत आहेत. मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यांची तयारी करुन घेण्यासाठी शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थिनी ऋतुजा मुठे हिने कोण होणार करोडपतीमध्ये 6 लाख 80 हजार रुपये जिंकल्याबद्दल तिचा देखील विशेष सत्कार करण्यात आला.
मीनाताई जगधने म्हणाल्या की, कर्मवीर अण्णांचा सहवास जवळून लाभल्याने त्यांच्या प्रेरणेने रयत मध्ये निस्वार्थपणे कार्य सुरु आहे. रयतच्या शिक्षण महायज्ञाने समाजाला दिशा मिळाली असून, सक्षम समाज घडत आहे. प्रत्येक मुलामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्षमता, गुण व कौशल्य ओळखण्याचे त्यांनी सांगितले. दादाभाऊ कळमकर यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
रोहिणी वाघमारे म्हणाल्या की, मुलांमध्ये बालसंस्कार रुजविणे गरजेचे आहे. त्यांचे शिक्षण फक्त नोकरी व पैश्याच्या दृष्टीने न पाहता त्यांना सक्षम नागरिक घडविण्याच्या उद्देशाने असावे. आवडीनुसार करिअर करण्याची मोकळीक त्यांना देण्याचे पालकांना त्यांनी आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदीप पालवे, राजेंद्र देवकर, रोहिणी झावरे, राजश्री नागपुरे, स्मिता पिसाळ, महादेव भद्रे या अध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले. आभार सुजाता दोमल यांनी मानले.