मुलांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन
मुलांमधील वेगवेगळ्या क्षमता, गुण, कौशल्य ओळखण्याची गरज -मीनाताई जगधने
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांना ओळखता आले तर, त्यांना घडवता येईल. पालकांनी आपल्या मुलांमधील वेगवेगळ्या क्षमता, गुण, कौशल्य ओळखण्याची गरज आहे. मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करुन त्यांच्यात आपल्याबद्दल एक विश्वास निर्माण करता आला पाहिजे. मुले घडविताना पालकांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची ठरत असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाची पालक शिक्षक सहविचार सभा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना जगधने बोलत होत्या. याप्रसंगी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर, शाळेच्या माजी विद्यार्थिनी तथा पारनेर दामिनी पथकाच्या अध्यक्षा रोहिणी वाघमारे, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, अर्जुन पोकळे, विभागीय अधिकारी टी.पी. कन्हेरकर, सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळूंजकर, शिवाजीराव तापकीर, प्राथमिक विदयालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, प्रभारी मुख्याध्यापक महादेव भद्रे आदींसह शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक शिवाजी लंके म्हणाले की, पालक-शिक्षकांमधील विद्यार्थी हा दुवा आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक व पालकांमध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी पालक शिक्षक संघ महत्त्वाची भूमिका बजावत असते. मुलांची फी भरली, त्यांना शाळेत पाठवले एवढीच जबाबदारी पालकांची नसून, सर्व भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. मुलांच्या भवितव्यासाठी पालकांनी जागरूक रहावे. तर समाज माध्यमातून अनेक चांगल्या, वाईट गोष्टी मुले शिकत असतात त्याकडे पालकांनी बारीक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

रोहिणी वाघमारे म्हणाल्या की, मुलांमध्ये बालसंस्कार गरजेचे आहे. कुटुंब विभक्त होत गेल्याने बालसंस्काराची गरज भासत आहे. मुलांमध्ये अपयश पचवण्याची क्षमता निर्माण करता आली पाहिजे. मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्यासाठी घरात त्यांच्याशी संवाद प्रस्थापित करण्याचे आवाहन केले. तर मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी व त्यांचे चांगले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.
या पालक शिक्षक सहविचार सभेत शाळेसंबंधी विविध प्रश्न, समस्या व शैक्षणिक उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली. शिक्षक-पालक संघासाठी सर्व वर्गातील प्रतिनिधींची निवड या मेळाव्यात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पालवे यांनी केले. आभार सुजाता दोमल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी खोडदे, उर्मिला साळुंखे, अमित धामणे, प्रभाकर थोरात यांनी परिश्रम घेतले.