व्याख्यानाला राधाबाई काळे महाविद्यालयातील युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
करिअरमध्ये एकदा पुढे गेल्यावर मागे वळता येत नाही -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- करिअर करताना विचारपूर्वक क्षेत्र निवडल्यास यशाची शिखरे पादाक्रांत करता येते. एकदा पुढे गेल्यावर मागे वळता येत नाही. यासाठी ध्येय स्पष्टपणे समोर ठेऊन युवक-युवतींनी वाटचाल करण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शहर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राधाबाई काळे महाविद्यालयात युवतींसाठी करिअर मार्गदर्शनवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार बोलत होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या उपक्रमास महाविद्यालयीन युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.आर. थोपटे, कार्यक्रमाच्या संयोजिका तथा राष्ट्रवादी युवतीच्या शहर जिल्हाध्यक्षा अंजली आव्हाड, मार्गदर्शक व्याख्याते प्रा.डॉ. लहू गायकवाड, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, सुमित कुलकर्णी, ओबीसी सेलचे अमित खामकर, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, साधना बोरुडे, सुजाता दिवटे, सुनिता गुगळे, योगिता कुडिया आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, महाविद्यालयीन शिक्षण घेताना करिअर निवडण्याचा विद्यार्थ्यांपुढे मोठा प्रश्न असतो. यासाठी युवकांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासते. एक पाऊल चुकल्यास भविष्यातील मोठा धोका उद्भवू शकतो. जीवनाला आकार देण्याचे काम मार्गदर्शक शिक्षक करत असल्याचे सांगितले. तर धोरणात्मक निर्णयाने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम अजित पवार करत असून, त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राचा विकास साधला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मार्गदर्शक व्याख्याते प्रा.डॉ. लहू गायकवाड म्हणाले की, संघर्षातून जीवनाला यश मिळत असते. सकारात्मक विचार ठेवा, वाचनाने जीवनाला दिशा मिळत असते. यासाठी चांगल्या व्यक्तीमत्वांची आत्मचरित्र वाचली गेली पाहिजे. करिअर तात्काळ घडत नसते, त्यामागे सातत्य, परिश्रम व कष्टाची जोड असावी लागते. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करा. नोकरी म्हणजे करिअर नाही, एखाद्याचा नोकरी वेगळी व करिअर वेगळा असू शकतो. चांगल्या नीती मूल्याने आपले व्यक्तीमत्व घडून यशस्वी होता येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर कोणत्या क्षेत्रात कशा पध्दतीने करिअर निवडावे? यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
अंजली आव्हाड म्हणाल्या की, ग्रामीण भागातील मुली उच्च शिक्षणासाठी शहरात येतात. जीवनात काहीतरी करण्याची त्यांच्यात जिद्द असते. योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जीवन यशस्वी बनते. या उद्देशाने महाविद्यालयीन युवतींना योग्य मार्गदर्शन व दिशा देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक अनुजा अब्दुले यांनी केले. आभार प्रा. विष्णू अडसुरे यांनी मानले.