हिंद सेवा मंडळ व भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने खामकर यांचा गौरवपूर्ण सत्कार
रात्र प्रशालेतील शिक्षक अंधकारमय वाटेत विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावत आहे – शिरीष मोडक
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्र शाळेतून होतकरु विद्यार्थी घडविणारे देवीदास खामकर यांच्या सेवापुर्तीनिमित्त हिंद सेवा मंडळ व भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये झालेल्या सेवापुर्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, कार्याध्यक्ष अॅड. अनंत फडणीस, संचालिका ज्योती कुलकर्णी, चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्राचार्य सुनील सुसरे म्हणाले की, रात्र प्रशालेत 31 वर्ष सेवा देणारे ज्येष्ठ शिक्षक देवीदास खामकर यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. 1992 साली ते शाळेत रुजू झाले. दिवसा कबाड, कष्ट करुन रात्री शिक्षणाच्या गोडीने शाळेत येणार्या विद्यार्थ्यांना त्यांनी तळमळीने शिकवले. त्यांचे अनेक माजी विद्यार्थी घडले असून, त्यांचे रात्र प्रशालेतील शिक्षणासाठीचे योगदान दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, शहरातील भाई सथ्था नाईट हायस्कूल एका कुटुंबाप्रमाणे असून, या कुटुंबात विद्यार्थ्यांना रात्री विद्यादानाचे पवित्र कार्य करुन त्यांना दिशा दिली जात आहे. होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकविण्यासाठी रात्र शाळेचे शिक्षक पालकांची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिरीष मोडक म्हणाले की, रात्र प्रशालेतील मुल-मुली मोठ्या जिद्दीने शिक्षण घेऊन समाजात आपले कर्तृत्व सिध्द करत आहे. बिकट परिस्थितीवर मात करुन शिक्षणाने परिस्थिती बदलण्याच्या संघर्षात हिंद सेवा मंडळ त्यांच्या पाठिशी उभी असून, त्यांच्या जडणघडणीत योगदान देत आहे. रात्र प्रशालेतील शिक्षक अंधकारमय वाटेत विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभाची भूमिका बजावत असल्याने अनेकांचे या रात्र शाळेत शिक्षण घेऊन भवितव्य घडले असल्याचे त्यांनी सांगितले. मानद सचिव संजय जोशी व ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा यांनी खामकर यांनी पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना देवीदास खामकर म्हणाले की, फक्त नोकरीतून निवृत्त होत असलो तरी, रात्र शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नेहमीच कार्य करणार आहे. या होतकरु मुलांशी एक वेगळी नाळ जोडली गेली असून, रात्र प्रशालेच्या सर्व शैक्षणिक उपक्रमात सहभाग असणार असल्याचे ते म्हणाले. तसेच रात्र प्रशालेचे शिक्षक अमोल कदम यांची राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. आभार बाळू गोर्डे यांनी मानले.