मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील साहित्याचा संच वाटप
युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार जाधव यांचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांसह साजरी करण्यात आली. युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार जाधव यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबवून मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांना दैनंदिन वापरातील साहित्याचा संच (मॉर्निंग किट) वाटप करण्यात आला.
शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता खैरे आदींसह युवक व मुकबधीर विद्यालयातील शिक्षक, सहकारी उपस्थित होते.
तुषार जाधव म्हणाले की, महापुरुषांच्या विचाराने त्यांची जयंती साजरी होण्याची गरज आहे. महामानवांची समाजातील उपेक्षीत घटकांना नेहमीच आधार दिला. त्यांचा कार्याचा वारसा पुढे चालविण्यासाठी युवकांनी त्यांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संभाजी कदम म्हणाले की, समाजातील दुर्लक्षीत घटक असलेल्या मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांसह सामाजिक उपक्रमाने महामानवाची राबविलेली जयंती कौतुकास्पद आहे. युवकांना महापुरुषांच्या विचाराने दिशा मिळणार असून, त्यांचे खरे विचार समाजापर्यंत जाण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांना टॉवेल, साबण, टीथ ब्रश, टूथ पेस्ट, तेल, कंगवा, पावडर आदी गोष्टींचा समावेश असलेल्या मॉर्निंग किटचे वाटप करण्यात आले. तर विद्यार्थ्यांना अल्पोपहार व फळांचे वाटपही यावेळी करण्यात आले.