चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टचा सामाजिक उपक्रम
परिस्थितीला संधी म्हणून पहावे -गिरीश कुलकर्णी
अहमदनगर (प्रतिनिधी)- चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टच्या वतीने गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. नुकत्याच शाळा सुरु झाल्या असून, गणवेश नसलेल्या विद्यार्थ्यांची गरज ओळखून या संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
पद्मशाली विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सचिव डॉ. रत्ना बल्लाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालयाचे संस्थापक गिरीश कुलकर्णी, मराठी सिने दिग्दर्शक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अभिजीत दळवी, ट्रस्टचे अध्यक्ष संतोष भीमराज गोटीपामुल, सचिव सुजाता संतोष गोटीपामुल, संचालक प्रतीक बोज्जा, शालेय संस्थेच्या सचिव डॉ. रत्ना बल्लाळ, विश्वस्त राजेंद्र म्याना, शाळेचे मुख्याध्यापक संदिप छिंदम आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविकात ट्रस्टचे अध्यक्ष संतोष गोटीपामुल यांनी चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्ट निस्वार्थ सामाजिक भावनेने योगदान देत आहे. गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. चैतन्य महावतार बाबाजी यांच्या विचाराने मनुष्यरुपी सेवा करण्यासाठी ट्रस्टचे सर्व सदस्य योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गिरीश कुलकर्णी म्हणाले की, परिस्थितीपुढे विद्यार्थ्यांनी डगमगू नये. येणारे संकट संधी घेऊन येत असतात. परिस्थितीला संधी म्हणून पहावे व ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करण्याचे सांगितले.
सिने दिग्दर्शक अभिजीत दळवी यांनी देवळातील देव पुजण्यापेक्षा मनुष्यातील देवाची पूजा श्रेष्ठ ठरते. माणसात देव पाहिल्यास अनेक गरजूंना आधार मिळणार आहे. स्वामी विवेकानंद यांनी देखील मनुष्यातच देव पाहिला. त्यांच्या विचाराने युवकांनी मार्गक्रमण केल्यास देश बलशाली होणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्रेया संतोष गोटीपामुल हिने चैतन्य महावतार बाबाजी यांची माहिती व त्यांचे कार्य विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू रंगा यांनी केले. शाळेच्या वतीने ट्रस्टचे आभार मानण्यात आले.