कर्ज फेडलेल्या कर्जदारावर बेकायदेशीरपणे कर्जाची रक्कम दाखवून धमकावल्याचा आरोप
चेअरमन, व्हाईस चेअरमन व वसुली अधिकारी आले अडचणीत
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेमधून कर्जाची परतफेड करुन देखील कर्जदारावर बेकायदेशीरपणे कर्जाची रक्कम दाखविण्यात आली. कर्जदाराने सहकारी संस्था उपनिबंधकाकडे तक्रार केल्याचा राग येऊन संबंधित पतंसंस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व वसुली अधिकारी यांनी कर्जदारास शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल केलेल्या खाजगी फिर्यादीवरुन संबंधितांविरोधात चौकशी करण्याचे आदेश कोतवाली पोलीस स्टेशनला दिले आहे.
श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेमधून एका विवाहितेच्या पतीने कर्ज घेतले होते. सदरचे कर्ज त्यांनी 2012 मध्ये पूर्णपणे फेडून निरंक केले व संस्थेकडून नील दाखला सुद्धा घेतला. मात्र पतसंस्थेने त्यांच्या खात्यावर 138 कलम वकील फी 2200 व कोर्ट खर्च 4000 व 138 कलम 350 रुपये रक्कम टाकली असे एकूण रक्कम 6 हजार 550 एवढी रक्कम बेकायदेशीर खात्यावर कर्ज म्हणून टाकली. या पतसंस्थेच्या गैरकारभाराविरुद्ध सहकारी संस्था उपनिबंधक यांच्याकडे तक्रार केली.
सदर तक्रार केल्याचा राग येऊन पतसंस्थेचे चेअरमन नारायण विश्वनाथ कोडम, व्हाईस चेअरमन विनायक विश्वनाथ मच्चा व वसुली अधिकारी सुभाष विश्वनाथ कोडम यांनी कर्जदाराच्या घरात घुसून कर्जदाराच्या पत्नीस अश्लील शिवीगाळ करुन तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी धकमावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कर्जदाराने केला आहे.
त्यानंतर कर्जदाराच्या पत्नीने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अहमदनगर यांच्या न्यायालयात भा.द.वि. कलम 354 प्रमाणे खाजगी फिर्याद दाखल केली. सदर फिर्यादीची दखल घेऊन न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 202 (1) प्रमाणे फौजदारी सदर चौकशी अर्जामध्ये आदेश पारित करून सदर व्यक्तीविरुद्ध चौकशी अहवाल दोन महिन्याच्या आत सादर करण्याबाबत कोतवली पोलीस स्टेशनला आदेश पारित केले आहे.