प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आयुक्तांना निवेदन
बंद पडलेले दिव्यांग कक्ष पुन्हा सुरु करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेकडून शहरातील दिव्यांगांना नियमित निर्वाह भत्ता मिळावा व बंद पडलेले दिव्यांग कक्ष पुन्हा सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने मनपा आयुक्तांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, शहराध्यक्ष संदेश रपारिया, उपाध्यक्ष काकासाहेब दसपुते, गणेश कोमाकुळ, संजय व्यवहारे, नारायण अंधे, कांचन वखारिया, सरला मोहळकर, गजाला सय्यद, नंदा शिंदे आदी उपस्थित होते.
महापालिका कडून दिव्यांगांना मिळणारा निर्वाह भत्ता कधीही नियमितपणे मिळालेला नाही. दिव्यांगांना हा भत्ता वेळेवर मिळत नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह व औषधोपचाराचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून दिव्यांगांचा निर्वाह भत्ता त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच महापालिकेतील दिव्यांग कक्ष बंद असून, दिव्यांगांच्या सोयीसाठी सदर कक्षासाठी तातडीने कर्मचारी नियुक्त करुन दिव्यांग कक्ष सुरू करण्याचीही मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने केली आहे.