• Sat. Mar 15th, 2025

मराठी पत्रकार परिषद आयोजित आदर्श तालुका, जिल्हा पुरस्कार वितरण सोहळा

ByMirror

Mar 16, 2023

7 एप्रिल रोजी नगर जिल्ह्यातील कर्जत येथे संपन्न होणार

राज्यातील पत्रकारांना उपस्थित रहाण्याचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणार्‍या वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार आणि मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्षांचा मेळावा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे 7 एप्रिल रोजी संपन्न होत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांनी केली आहे.


यापुर्वी हा सोहळा चाकूर येथे होणार होता. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे चाकूर ऐवजी कर्जतला हा सोहळा संपन्न होत आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणार्‍या तालुका पत्रकार संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्कार वितरण सोहळे प्रामुख्याने ग्रामीण भागातच घेतले जातात. यावर्षी हा सोहळा नगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. 7 एप्रिल रोजी सकाळी 10. 30 वाजता पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होईल.


आमदार रोहित पवार हे मेळाव्याचे स्वागताध्यक्ष असून, या मेळाव्यासाठी राज्यभरातून किमान 600 प्रतिनिधी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तसे नियोजन कर्जत आणि जामखेड येथील संयोजन समिती संयुक्तरित्या करीत आहेत. मेळाव्यास पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख, विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, पुणे विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे यांनी केलं आहे.


कर्जत हे नगर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. विदर्भ मराठवाड्यातून येणार्‍या पत्रकारांना जामखेड मार्गे कर्जतला जाता येईल. कोकण, मुंबई, पुण्याकडून येणार्‍या पत्रकारांना सोलापूर रोडने भिगवण मार्गे कर्जतला जाता येईल. कर्जतला थेट रेल्वे नाही. नगर किंवा पुणे स्टेशनवरून बसने कर्जतला जाता येते. कर्जतचे रूट आणि अन्य माहिती लवकरच दिली जाणार आहे.

हा सोहळा घेण्याची संधी अहमदनगर जिल्ह्याला दिल्याबद्दल परिषदेचे सरचिटणीस मन्सुरभाई शेख यांनी जिल्ह्याच्या वतीने परिषदेचे नेते एस.एम. देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, मिलींद अष्टीवकर, विजय जोशी, आदी पदाधिकार्‍याचे आभार मानले असून, राज्यातील पत्रकारांच्या स्वागतासाठी उत्सुक असल्याचे मन्सुरभाई शेख यांनी सांगितले आहे.

यंदाचे पुरस्काराचे मानकरी तालुके पुढील प्रमाणे- नागपूर विभाग: मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा, अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती, लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली, नाशिक विभाग: अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव, पुणे विभाग: पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे, कोल्हापूर विभाग: जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली, औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद, कोकण विभाग: महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *