मुलांमध्ये आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीचे संवर्धन जिल्हा परिषद शाळेत घडते -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. तर विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे उभारुन तिरंगा ध्वजाला सलामी दिली. तर शाळेत माझी माती, माझा देश हा उपक्रम राबवून देशासाठी शहिद झालेल्या जवानांना वंदन करण्यात आले.
प्रारंभी ध्वजारोहण करण्यात आले. माजी नगरसेविका शारदाताई ढवण यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका अनिताताई काळे, सहशिक्षिका सुरेखा वाघ, शितल आवारे, नवनाथ गीते, सागर पिंपळे आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. भारत माता की जय…, वंदे मातरम… च्या घोषणांनी शालेय परिसर दणाणून निघाला. सडा-रांगोळी टाकून व तिरंगी फुग्यांनी शाळेची सजावट करण्यात आली होती.
अनिता काळे म्हणाल्या की, लहान वयातच मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्कम झाल्यास त्यांना पुढे अडचण येत नाही. जिल्हा परिषद शाळेत मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी मुलांना हसत खेळत शिक्षण दिले जात आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीचे संवर्धन जिल्हा परिषद शाळेत घडते. व्यवहारयुक्त व कृतीयुक्त शिक्षणामुळे शहरालगत शाळा असून, देखील पालकांची मुलांसाठी जिल्हा परिषद शाळेला पसंती मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शारदाताई ढवण यांनी इंग्रजी माध्यमातील शाळांच्या स्पर्धेत दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत घडत आहे. डिजीटल शिक्षण पध्दतीने मुलांना शिक्षण देऊन प्रत्येक गोष्टीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शाळेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
