• Wed. Oct 15th, 2025

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ByMirror

Jul 9, 2023

दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे यश

शिक्षणाने परिस्थिती बदलणे शक्य -डॉ. पारस कोठारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- परिस्थितीवर मात करण्यासाठी दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणार्‍या भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. या होतकरु गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत गौरव करण्यात आला. तर रात्र शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी कार्य करणार्‍या मासूम संस्थेच्या सर्वेक्षणात भाई सथ्था नाईट हायस्कूल अव्वल ठरली असून, शाळेतील इयत्ता दहावीतील तीन विद्यार्थ्यांनी राज्यात पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये स्थान पटकाविले आहे.


गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोडक, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा, कार्याध्यक्ष अ‍ॅकड. अनंत फडणीस, संचालिका ज्योती कुलकर्णी, चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे, ज्येष्ठ शिक्षक देविदास खामकर आदींसह सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


डॉ. पारस कोठारी म्हणाले की, रात्र प्रशालेत अनेकांनी शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य केले आहे. शिक्षणाने परिस्थिती बदलणे शक्य असून, विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कटिबध्द रहावे. रात्र प्रशालेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकविण्यासाठी मासूम संस्थेने अल्पोपहाराची केलेली सुविधा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.


अ‍ॅड. अनंत फडणीस म्हणाले की, मासूम संस्थेने होतकरू विद्यार्थ्यांना भरारी घेण्यासाठी पाठबळ दिले आहे. विविध व्यावसायिक कोर्ससाठी देखील भरीव आर्थिक मदत उपलब्ध करुन दिली आहे. मासूमच्या सर्वेक्षणात राज्यातून पहिल्या दहा मध्ये चमकलेल्या विद्यार्थ्यांनी हिंद सेवा मंडळाच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला असल्याचे सांगितले.


शिरीष मोडक म्हणाले की, भाई सथ्था नाईट हायस्कूल आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य करत आहे. फक्त शिक्षण न देता, मासूम संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना पायावर उभे करण्याचे काम देखील करत आहे. रात्र प्रशाळेचा निकाल 90 पर्यंत टक्के पर्यंत लागतो, त्यामध्ये रात्र शाळेतील शिक्षकांची विद्यार्थ्यांप्रती असली तळमळ दिसून येते. विद्यार्थ्यांनी परिस्थिती पुढे न डगमगता शिक्षणाच्या प्रवाहात येऊन स्वतःचा विकास साधण्याचे त्यांनी आवाहन केले.


यावेळी इयत्ता बारावी मधील रात्र प्रशालेच्या गुणवत्ता यादीत चमकलेले वाणिज्य शाखा प्रथम- निखील शेलार, द्वितीय- अक्षय सामल, तृतीय- कृष्णा शर्मा, कला शाखा प्रथम- मंगल गाजरे, द्वितीय- वर्षा जोशी, तृतीय- परेश साळवी तसेच मासूम संस्थेच्या सर्व्हेक्षणात चमकलेले व इयत्ता दहावीतील प्रथम- स्वाती दुनगू, द्वितीय- अंबिका मडूर, तृतीय- रेणुका उमाप यांचा उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


रात्र शाळेतील विविध उपक्रमासाठी मासूम संस्थेच्या संचालिका निकिता केतकर, शशिकांत गवस, कमलाकर माने, संदीप सूर्यवंशी, गुरुप्रसाद पाटील व बजाज फिनसर्व यांचे सहकार्य मिळत आहे. यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे संस्थेचे मानद सचिव संजय जोशी व ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले. आभार बाळू गोर्डे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *