अध्यक्षपदी वाही, सचिवपदी वधवा, खजिनदारपदी आहुजा तर उपाध्यक्षपदी चावला यांची नियुक्ती
शीख, पंजाबी समाजाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शीख, पंजाबी समाजाच्या भाई दयासिंहजी गुरुद्वारा गोविंदपूरा ट्रस्टचे विश्वस्त व समाजातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत गुरुद्वाऱ्याच्या अध्यक्षपदी बलदेवसिंह वाही, सचिवपदी हरजीतसिंह वधवा, खजिनदारपदी जनक आहुजा तर उपाध्यक्षपदी राजेंद्रसिंह चावला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
गुरुद्वाराचे अध्यक्ष गुरुद्यालसिंग वाही यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त होते. बैठकीचे प्रारंभी स्व. वाही यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांच्या स्मृतींना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी समाजातील विविध मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या विकासासाठी व विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, त्या दृष्टीकोनाने कार्य सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केले.
नुतन अध्यक्ष बलदेवसिंह वाही हे उद्योजक असून, त्यांचा कन्स्ट्रक्शन क्षेत्रातही कार्यरत आहे. गुरुद्वाऱ्याच्या उभारणीत त्यांचे सहकार्य राहिले आहे. तर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सक्रिय सदस्य आहेत. सचिव हरजितसिंह वधवा उद्योजक असून, लायन्सचे सक्रीय सदस्य व अहमदनगर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहे. तसेच लंगर सेवेच्या माध्यमातून कार्य करत आहे. विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्य करत आहे. खजिनदार जनक आहुजा हे देखील उद्योजक असून, गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठानचे संचालक असून, लंगर सेवेत त्यांचे देखील योगदान सुरु आहे. विविध धार्मिक व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरु आहे. उपाध्यक्ष राजेंद्रसिंह चावला हे शहरातील शिलाई मशिनचे व्यावसायिक आहे. गुरुद्वाऱ्याच्या सेवा कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात.
या नूतन पदाधिकाऱ्यांचा समाजाच्या वतीने गुरुद्वाऱ्यामध्ये सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक रवींद्ररसिंह नारंग यांनी केले. या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
