अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील खड्डेमय रस्त्यांवर एका चाकावर सायकल चालवून या युवकाने चांगलाच कर्तब दाखविला. सर्वसामान्य नागरिकांना देखील खड्डेमय रस्त्यावर वाहन चालविताना दररोजची मोठी कसरत करावी लागत आहे.
मोठ्या प्रतिक्षेनंतर शेवटी उड्डाणपूल होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. मात्र शहरातील खड्डेमय रस्ते व धुळीने माखलेल्या रस्त्यांवरचा फुफाटा कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. सहनशील असलेले नगरकर मात्र या रस्त्यांवर वाट काढीत आपले रोजचे जीवन जगत आहे.
मात्र या रस्त्यांवर देखील आपली कसरत दाखवित युवकाने नगरकरांना भविष्यातील अशी कसरत करण्याची वेळ येऊ नये? असे सुचित केले नसावे ना. माळीवाडा वेस ते थेट जुने बस स्थानक येथील उड्डाणपूलाच्या खालून त्यांने खड्डे चुकवित आपल्या सायकल स्वारीचे कर्तब दाखविले. या सायकलस्वारीच्या कर्तबाने अनेक नागरिकांचे लक्ष वेधले.