जागतिक ऑटिझम जागरूकता दिनाचा उपक्रम
ऑटिझमची पालकांमध्ये जागृती आवश्यक -डॉ. चेतना बहरुपी
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑटिझम हा मुलांमध्ये होणारा मानसिक विकार आहे. या मानसिक विकारावर पालकांना जागरूक करण्यासाठी आणि मुलांचे जीवन सुधारण्यासाठी जागृती होणे आवश्यक आहे. ऑटिझमची लक्षणे बाळाच्या जन्मानंतर तीन वर्षांच्या आत दिसू लागत असल्याचे प्रतिपादन डॉ. चेतना बहरुपी यांनी केले.
जागतिक ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त बालिकाश्रम रोड, ईसार पेट्रोल पंप येथील न्यूक्लिअस हॉस्पिटलमध्ये ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तर पालकांमध्ये या आजाराची जागरुकता करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ. बहरुपी बोलत होत्या. या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला. यामध्ये मुलांची ऑटिझमबद्दल तपासणी करुन औषधही मोफत देण्यात आले. तर मुलांची शारीरिक तपासणी देखील करण्यात आली.

व्याख्यानात पुढे डॉ. बहरुपी म्हणाल्या की, ऑटिझम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ऑटिझममध्ये मुलांना समाजामध्ये मिसळायला, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधायला त्रास होतो. ही मुले जीवनातील साध्या गोष्टी आई-वडिलांना सांगू शकत नाही. दैनंदिन जीवनातील धोके त्यांना समजू शकत नाही. या आजारात वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगवेगळी लक्षणे दिसतात. काहींना वर्तणुकीशी संबंधित समस्या असतात. अशा मुलांची काळजी घेत असताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. ऑटिझममुळे मुलांचा मानसिक विकास पूर्णपणे खुंटते असल्याचे त्यांनी सांगितले.
मुलं आई-वडिलांशी संपर्क साधत नाहीत. त्यांच्या हावभावांना प्रतिसाद देत नाहीत. मुलं एकांतात राहणं पसंत करतात. आवाज ऐकूनही प्रतिसाद न देणे व मोठ्या आवाजाला घाबरणे, ऑटिझम मुलांमध्ये भाषेशी संबंधित समस्याही दिसून येतात. ही मुलं स्वतःमध्ये हरवून जातात. विचित्र आवाज काढणे आदी लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास ऑटिझमसाठी उपचार घेणे आवश्यक आहे.
ऑटिझमवर अचूक उपचार नसून, मुलाची स्थिती पाहून काय उपचार ठरविण्यात येतात. यामध्ये थेरपीचा समावेश असून, बिहेव्हियर थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी आदी थेरपींचा समावेश आहे. या थेरपीने जवळपास सर्व मुले बरी होत असल्याचेही डॉ. बहरुपी यांनी सांगितले. तर त्यांनी मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याबद्दल तसेच पालकांना मुलांच्या आहार व व्यायमाबद्दल मार्गदर्शन करुन ऑटिझमचे अल्प व तीव्र प्रकाराची माहिती दिली. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या बालकांचा सांभाळ करताना त्यांच्यावर उपचार करुन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार्या उपस्थित पालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.