पहिल्याच दिवशी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची उत्स्फूर्त हजेरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे गुढीपाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचा त्रितपपूर्तीचा सोहळा धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. या सप्ताहाचे उद्घाटन संत एकनाथ महाराज यांचे वंशज ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी (पैठण) यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

यावेळी साहेबराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, भागचंद जाधव, भाऊसाहेब जाधव, भाऊसाहेब ठाणगे, अतुल फलके, किरण जाधव, प्रमोद जाधव, कोंडीभाऊ फलके, गोरख फलके, श्याम जाधव, राम जाधव, गणेश कापसे, भाऊसाहेब कापसे, ह.भ.प. आदिनाथ महाराज कुलट, भरत बोडखे, बाळू फलके, नामदेव फलके, लक्ष्मण चौरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांनी किर्तनाचा पहिला दिवस भगवंताच्या वर्णाने सुरुवात केली. ते म्हणाले की, हा सप्ताह परिपूर्ण असून, त्रितपपूर्तीच्या या सोहळ्यात भाविकांना भक्तीचा व जीवनाचा खरा मार्ग सापडणार आहे. जो भगवंताला विसरत नाही, त्या भक्तावर भगवंताची नेहमी कृपा असते. भक्तांची तो परीक्षा घेत असतो, मात्र अडचणीच्या काळात भगवंत नेहमीच धावून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

गावाच्या नवनाथ मंदिरात या धार्मिक सोहळ्याला प्रारंभ झाले असून, हे सप्ताहाचे 36 वे वर्ष आहे. दहा दिवस चालणार्या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पहिल्या दिवसापासूनच उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. कार्यक्रमस्थळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबाबा देशमुख (आळंदी), वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज भोंदे (पिंपळगाव माळवी) व वैकुंठवासी ह.भ.प. जयसिंग महाराज मडके (सोने सांगवी) यांच्या आशिर्वादाने तर गुरुवर्य ह.भ.प. मारुती बाबा कुर्हेकर (आळंदी देवाची), गुरुवर्य ह.भ.प. डॉ. नारायण महाराज जाधव (आळंदी), रामायणाचार्य ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे (आळंदी), ह.भ.प. विठ्ठल महाराज खळदकर (निमगाव वाघा) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडत आहे. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी निमगाव वाघा ग्रामस्थ, भजनी मंडळ, नवनाथ सोहळा समिती व अखिल भारतीय वारकरी मंडळ परिश्रम घेत आहे.