अहिल्यादेवींचे जनतेसाठी कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी -अतुल फलके
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाउंडेशन ट्रस्ट व भुसारे कोचिंग क्लासेसच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी एकता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक अतुल फलके, भुसारे कोचींग क्लासेसच्या संचालिका सुषमा भुसारे, युवराज भुसारे, बाबुराव जाधव, विजय भुसारे, नवनाथ जाधव, बापूसाहेब सुंबे, विजय भगत, दिनेश भुसारे, निलेश भुसारे, सुधीर खळदकर, प्रकाश वाघुले, रावसाहेब डोंगरे, विकास जाधव, रंगनाथ शिंदे, प्रकाश फलके, अन्सार शेख, हिरामन केदार आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतुल फलके म्हणाले की, समाजातील अनिष्ट प्रथा, रुढी व परंपरेला छेद देत अहिल्यादेवी होळकर यांनी कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. स्त्रीयांमधील उत्तम राज्यकर्त्या म्हणून त्या पुढे आल्या. जनतेचे प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. जनतेसाठी कल्याणकारी राज्य करताना त्यांनी मंदिरे व नदीघाट बांधले. अनेक मंदिराचा जीर्णोध्दार केला. जनतेसाठी असलेले त्यांचे कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
सुषमा भुसारे म्हणाल्या की, समाज हितासाठी बदल घडविण्यात अहिल्यादेवी होळकरांचे मोठे योगदान आहे. अनिष्ट रुढी परंपरांना फाटा देऊन त्यांनी महिलांना सन्मानाची वागणुक मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.