• Wed. Oct 15th, 2025

निंबोडीत युवकांना फ्रेश फुड ऑइलचे मार्गदर्शन, तर ग्रामस्थ व महिलांची आरोग्य तपासणी

ByMirror

Jul 20, 2023

कौशल्य आत्मसात करुन युवकांनी उद्योग व्यवसायात यशस्वी व्हावे -तुकाराम डफळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे कला, कौशल्य, संवाद कौशल्य आत्मसात करून युवकांनी उद्योग व्यवसायात यशस्वी होण्याचे आवाहन माजी सैनिक मेजर तुकाराम डफळ यांनी केले.


जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबादेवी प्रतिष्ठान, जिल्हा एड्स प्रतिबंध विभाग, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी काझी व सम्राट उद्योग समूह अंतर्गत फ्रेश फुड ऑइलबद्दल मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन निंबोडी (ता. नगर) येथे करण्यात आले. याप्रसंगी छावाचे जिल्हाध्यक्ष मेजर रावसाहेब काळे, जय युवाचे अ‍ॅड. महेश शिंदे, मेजर सुनील अंधारे, मेजर शिवाजी वेताळ, उद्योजक विनोद साळवे, मुंबादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू काकडे, उद्योजक आदिनाथ वनारसे, छावाचे दत्ताभाऊ वामन, डॉ. संतोष गिर्‍हे, वैशाली कुलकर्णी, रेखा केळगंद्रे, डॉ. संतोष चौधरी, संतोष बेरड, चंद्रशेखर वाघ, नंदा वाघ, पोपट बनकर, गुलाब काकडे, बाबू काकडे आदी उपस्थित होते.


रावसाहेब काळे म्हणाले की, तेल प्रक्रिया उद्योग सर्वसामान्यांचा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सम्राट उद्योग समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेंगदाणे, करडई, सूर्यफूल, तीळ, बदाम आदींचे तेल कोल्ड प्रेस पद्धतीने काढून मिळणार आहे. याचा फायदा शेतकरीसह सर्वांनाच होणार आहे. उच्च प्रतीचे पौष्टिक चरबी न वाढणारे व उच्च रक्तदाब कमी करणारे तेल केस, त्वचा विकारावर गुणकारी ठरणार आहे. तर भेसळमुक्त तेल उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


अ‍ॅड. महेश शिंदे यांनी आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा असून, आहारात तेल कोणते वापरले जाते हे देखील पहाणे गरजेचे आहे. तर गरजूंना मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आधार मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैशाली कुलकर्णी यांनी एचआयव्ही एड्स बद्दल जनजागृती करुन एड्सची प्राथमिक लक्षणे, त्याचा होणारा संक्रमण, त्यावर उपाययोजनेबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी, रक्ताच्या विविध तपासण्या, सांधेदुखी, स्त्री रोग तपासणी करण्यात आली. तर मोतीबिंदू आढळलेल्या ज्येष्ठांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. शिबिरात गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी काझी यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्‍वर खुरांगे आदींचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद साळवे यांनी केले. आभार बाबू काकडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *