महाराष्ट्राने अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू देशाला दिले -राजेंद्र दरेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- कुस्ती क्षेत्राला चालना देऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीचे मल्ल घडविणार्या महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर वस्तादांना जय मल्हार फाउंडेशन आणि जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या वतीने महाराष्ट्र भूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निंबोडी (ता. नगर) येथे झालेल्या वस्तादांच्या गौरव सोहळ्यासाठी प्रतिभाताई पाचपुते, फाऊंडेशनचे अध्यक्ष वस्ताद पै. भाऊसाहेब धावडे, पै. संदीप यलभर, वस्ताद प्रकाश सातव, राजेंद्र दरेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, ह.भ.प. किरण महाराज भागवत, वस्ताद दौलत यलभर आदींसह कुस्तीपटू व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात पै. भाऊसाहेब धावडे म्हणाले की, समाजातील युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात असताना कुस्ती क्षेत्रातील वस्ताद मंडळी युवकांना व्यायामाकडे वळवित आहे. तर सदृढ आरोग्याची चळवळ कुस्ती खेळाद्वारे चालविली जात आहे. अनेक वस्तादांनी उत्तम कुस्तीपटून घडविले असून, त्यांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी सांगितले.
राजेंद्र दरेकर म्हणाले की, कुस्तीला संपूर्ण जीवन समर्पण करून अनेक मल्ल घडविण्याचे काम वस्ताद मंडळी करत आहे. लाल मातीतून कुस्तीपटू घडविण्याचे काम करणार्या वस्तादांचा सन्मान होणे गौरवाची बाब आहे. महाराष्ट्राने अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू देशाला दिले असून, वस्ताद मंडळी मल्लविद्येचा वसा पुढे चालवीत असल्याचे त्यांनी सांगितले.

वस्ताद प्रकाश सातव म्हणाले की, आपला शिष्य मोठा होवून, त्याने देशाच्या कुस्ती क्षेत्रात नाव गाजवावे, या भावनेने वस्ताद कुस्तीपटू घडविण्याचे कार्य करत आहे. या पुरस्काराने लाल मातीचा सन्मान झाला असून, पुरस्कार प्राप्त वस्तादांना पुढील कार्यास नक्कीच प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिभाताई पाचपुते यांनी कुस्ती या खेळात युवकांसह मुली देखील पुढे येत आहेत. कुस्ती हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग असून, संस्कृती जपण्याचे काम वस्ताद मंडळी करत आहे. त्यांचा हा गुणगौरव सोहळा कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोहळ्यात पै. वसंत पाटील (सांगली), पै. नसरुद्दीन नाईकवाडी (सांगली), पै. सईद चाऊस (बीड), पै. भरत नाईकल (कोपरगाव), पै. नाना डोंगरे (नगर), पै. गणेश दांगट (पुणे), पै. नवनाथ घुले (पुणे), पै. डी.बी. म्हात्रे (मुंबई) या वस्तादांना महाराष्ट्र भूषण व आदर्श वस्ताद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले.
जय मल्हार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलच्या माध्यमातून नवोदित कुस्तीपटूंना घडविण्याचे व कुस्ती क्षेत्राला चालना देण्याचे काम करणारे वस्ताद पै. भाऊसाहेब धावडे यांचा वस्ताद दौलत यलभर यांच्या वतीने चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साबळे यांनी केले. आभार प्रकाश पोटे यांनी मानले.