अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील कुस्तीपटू पै. संदिप डोंगरे याची नगर तालुका तालिम सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदिप डोंगरे हा कुस्ती व ज्युदोचा राज्याचा खेळाडू असून, नुकतीच त्याची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
डोंगरे याने राज्यस्तरीय तसेच कुमार व ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. तसेच विद्यापिठाकडून देखील त्याने कुस्ती व ज्युदो स्पर्धेचे नेतृत्व केले होते. तो अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे खजिनदार तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा चिरंजीव आहे. डोंगरे यांच्या मुलींनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मजल मारली असताना, त्यांचा मुलगा देखील नगर तालुक्यात कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी योगदान देणार आहे. या निवडीबद्दल त्याचे जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, उपाध्यक्ष दत्तात्रय अडसुरे, पै. युवराज पठारे, सचिव धनंजय जाधव, शहराध्यक्ष पै. नामदेव लंगोटे, अजय अजबे, विलास चव्हाण, नगर तालुका तालिम सेवा संघाचे उपाध्यक्ष काशिनाथ पळसकर, सचिव बाळू भापकर, खजिनदार किसन वाबळे, उत्तम कांडेकर यांनी अभिनंदन केले.