स्थानिक नागरिकांच्या वतीने आयुक्तांना निवेदन
हाती घेतलेले रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन -पै. महेश लोंढे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगर येथील रस्त्याचे बंद पडलेले काम त्वरीत सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक नागरिकांच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अनिल शिंदे, युवा सेनेचे शहराध्यक्ष पै. महेश लोंढे, सखाराम गोरे, मदन देशमुख, महेबूब शेख, अनिल कदम, सखाराम चौधरी, अजय कदम, सुनील वाव्हळ, अक्षय कोंडा, योगेश चौधरी आदी उपस्थित होते.
नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरच्या रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाची दखल घेऊन सदर रस्त्याचे काम तीन महिन्यापूर्वी हाती घेण्यात आले. काही दिवस रस्त्याचे काम सुरु करुन अर्धवट काम सोडून देण्यात आले आहे. नागरी वस्तीमधील या रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरच पावसाळा सुरु होत असल्याने काम सुरु न झाल्यास नागरिकांना रहदारीसाठी मोठी अडचण निर्माण होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगर येथील रस्त्याचे बंद पडलेले काम त्वरीत सुरु करावे. हाती घेतलेले रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्याचा इशारा युवा सेनेचे शहराध्यक्ष पै. महेश लोंढे, यांनी दिला आहे.