युवा सेनेचे महेश लोंढे यांचा पुढाकार
रस्ता बनविण्यासाठी प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? -महेश लोंढे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरालगत असलेल्या नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील सिना नदी पुल ते बायपास रस्त्या पर्यंत अत्यंत दुरवस्था झाली असताना युवा सेनेचे महेश लोंढे यांनी स्वखर्चातून मुरुमद्वारे खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीचे काम केले. नुकतेच त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने नगर-कल्याणच्या सिना नदीच्या पुलावर व खराब झालेल्या खड्डेमय रस्त्याच्या ठिकाणी मुरुम टाकले व कामगारांच्या माध्यमातून रस्त्याचे सपाटीकरण करुन घेतले.

नगर-कल्याण रस्त्यावर शहरासह बाहेरील वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्यामुळे खड्डयात पाणी साचत असल्याने खड्डा लक्षात न आल्यास अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. या खराब रस्त्यावरुन येण्या-जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर शालेय विद्यार्थ्यांना देखील या अडचणीचा सामना करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करुन देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने महेश लोंढे यांनी खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती केली.
महेश लोंढे म्हणाले की, नगर-कल्याण रस्त्यावर सिना नदी पुल ते बायपास पर्यंत मोठी दुरावस्था झालेली आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून, खड्डे चुकवण्याच्या नादात व पावसाच्या पाण्यात खड्डा लक्षात न आल्याने अपघात घडत आहे. अनेक नागरिकांना दुखापत झाली असून, नागरिकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने खड्डे बुजविण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर हा रस्ता बनविण्यासाठी प्रशासन एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.