• Fri. Sep 19th, 2025

दहशत पसरविणार्‍या जामखेडच्या त्या माजी नगरसेवकावर एमपीडीएनुसार कारवाई व्हावी

ByMirror

May 24, 2023

रिपाईचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व टोळी बनवून सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणार्‍या जामखेडच्या त्या माजी नगरसेवकावर एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी रिपाईचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, लखन सरोदे, दिलदार खान, शाहबाज खान आदी उपस्थित होते.


जामखेड येथील माजी नगरसेवक शामीर लतीफ सय्यद व त्याच्या साथीदारांवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.त्यांची जामखेड शहरांमध्ये मोठी दहशत आहे. त्याने एक टोळी निर्माण करुन सर्वसामान्यांवर दहशत करत आहे. त्या विरोधात कोणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. कोणी तक्रार देण्यास पुढे आल्यास पोलीस देखील गुन्हे दाखल करुन कारवाई करत नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या माजी नगरसेवकाला पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.


त्या माजी नगरसेवकावर दहा गुन्हे दाखल असून, त्याच्या टोळीमधील अनेक व्यक्तींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 2001 साली त्याला अमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्याचप्रमाणे 2011 मध्ये जातीय दंगल घडली होती, त्यामध्ये देखील त्याचा हद्दपारिचा प्रस्ताव होता. राजकीय आश्रय असल्याने व राजकीय दाबामुळे त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली जात नाही. 30 मार्च रोजी दिलदार इलियास खान व शहाबाज इलियास खान यांना शामीर सय्यद व त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खिशातून पैसे काढले व गळ्यातील सोन्याची चैन ओरबडून घेतली. तरी देखील संबंधित पोलीस अधिकार्‍यांनी त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करून घेतला नाही. हाताश होऊन दिलदार खान यांनी न्यायालयामध्ये गुन्हा दाखल होण्याकरिता 28 एप्रिल रोजी दावा दाखल केला आहे. तो काढून घेण्यासाठी तो माजी नगरसेवक व त्याच्या टोळीतील गुंड फोन करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


जामखेडच्या त्या माजी नगरसेवकावर एमपीडीएनुसार कारवाई करून त्याला जिल्ह्यातून हद्दपार करावे अन्यथा रिपाईच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *