औरंगाबाद येथील मनोज आव्हाड च्या अमानुषपणे झालेल्या हत्येचा निषेध
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर पक्षाच्या वतीने दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर मंगळवारी (दि.10 मे) निदर्शने करण्यात आले. औरंगाबाद येथील मातंग समाजातील युवक मनोज आव्हाड याचा अमानुषपणे झालेल्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला.
रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, जिल्ह्याचे नेते संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, मराठा आघाडी प्रमुख महेंद्र झिंझाडे, आकाश तांबे, गौरव साळवे, सतीश भैलुमे, रोहन कदम, योगेश त्रिभुवन, साजिद खान, कृपाल भिंगारदिवे, प्रतिक नरवडे, लोकेश बर्वे, अविनाश कांबळे, बाळासाहेब नेटके, अनिल बर्डे, बाळकृष्ण शेळके, सुरेखा नेटके, किशोर कांबळे, सिकंदर शेख, अविनाश कांबळे, बंटी गायकवाड, बापू जावळे, प्रशांत घोडके, प्रविण वाघमारे आदींसह रिपाईचे सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शासकीय विश्रामगृह येथे एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने कार्यकर्ते धडकले. विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी व्हावी, औरंगाबाद येथील मातंग समाजातील युवक मनोज आव्हाड हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, मागासवर्गीय भूमिहीन शेतमजुरांना 5 एकर गायरान जमीन देण्यात यावी, महात्मा फुले विकास महामंडळाच्या एनएफडीसी 4 व 5 लाख रुपयांचे कर्जपुरवठा तात्काळ करण्यात यावा, महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, चर्मोद्योग विकास महामंडळ व सर्व महामंडळा मार्फत कर्ज पुरवठा करण्यात यावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये वाढ करुन ती वेळेवर देण्यात यावी, मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतीगृहांना अनुदानात वाढ करावी, ओ.बी.सी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मशिदीवरील भोंग्यातून दिली जाणारी अजानसाठी रितसर परवानगी देण्यात यावी, भोंग्यावरुन दोन समाजात तेढ निर्माण करणार्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना देण्यात आले.
