पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झालेली विकासकामे जनतेपुढे घेऊन जावी -सूर्यकांत खंडाळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे जनतेपुढे घेऊन जावी. सध्या विकासकामाचे श्रेय लाटण्याचे प्रकार घडत असून, ज्याने काम केले त्याचे श्रेय त्यालाच मिळाले पाहिजे. आमदार संग्राम जगताप शहर विकासासाठी मोठे योगदान देत असून, त्यांनी शहरात केलेली विकास कामे, सुरु असलेली कामे व भविष्यातील कामांचा लेखाजोखा मांडण्याचे आवाहन सूर्यकांत खंडाळे यांनी केले.
एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत प्रभाग क्र.15 रेल्वे स्टेशन परिसरातील नागरिक, पक्षाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांचा संवाद कार्यक्रम येथील राष्ट्रवादी भवनात पार पडला.
यावेळी खंडाळे बोलत होते. राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस माजी नगरसेवक संभाजी पवार, विजय गव्हाळे, दत्ता खैरे, ओबीसी सेलचे अमित खामकर, निलेश बांगरे, सुरेश खंडागळे, अरुण नाणेकर, प्रमोद कुलकर्णी, सुभाष पवार, दिपक लोंढे, सोमनाथ रोकडे, राजू पवार, प्रा. संदीप भोर, अशोक आगरकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, एखादी गोष्ट जनतेच्या मनावर सतत बिंबवल्यास त्यांचे मत परिवर्तन होते. यासाठी पक्षाचे विचार व ध्येय धोरणाबरोबर सामाजिक कार्य घेऊन गेल्यास जनता पक्षाबरोबर जोडली जाणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. पक्षात संख्येपेक्षा वैचारिक पातळी असलेले कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. शहरात मागील 25 वर्षाचा बॅक लॉग भरुन काढण्याचे कार्य आमदार संग्राम जगताप करत आहे. शहराला शहरीकरणाचे रूप प्राप्त करून देण्यासाठी ते योगदान देत असून, महापालिकेची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना त्यांनी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी आणून अनेक विकास कामे मार्गी लावली असल्याचे त्यांनी सांगितले. तर तात्पुरत्या विकास कामांचा विचार न करता, भविष्यातील तीस ते चाळीस वर्षाचा विचार करून शहरात विकास कामे केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व नागरिकांनी आपले मतं मांडली.