कवडेनगर भागात नागरी सुविधा देण्याची मागणी
पाण्याचा प्रश्न तात्काळ न सोडविल्यास नगर-कल्याण महामार्गावर रास्ता रोको -पै. महेश लोंढे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नगर-कल्याण रोड, कवडेनगर येथील नागरिकांना पाण्याच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना महिलांनी आयुक्तांसमोर पिण्यासाठी पाणी देण्याची आर्त हाक दिली. तर या भागात नागरी सुविधा देण्याची मागणी केली.
युवा सेनेचे शहर जिल्हाप्रमुख पै. महेश लोंढे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी अजय विधाते, दशरथ पाटील, हरी तापकेरे, मोबिना सय्यद, छाया विधाते, संदीप गायकवाड, शोभा गायकवाड, वंदना कारखिले, संगिता जाधव, दत्ता कोल्हे, उमेश कोलपेक, धीरज विश्वकर्मा, सोमनाथ जाधव, छाया विधाते, अनुजा कांबळे, अजय विधाते आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगर-कल्याण रोड येथील कवडेनगर भागात अंतर्गत रस्ते नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे. पावसाळ्यात नागरिकांना चिखलामुळे बाहेर पडणे देखील अवघड होते. या भागात ड्रेनेजलाईन नसल्याने शौचालय बांधणे अवघड झाले आहे. महिलांची कुचुंबना होत आहे. मोजकेच स्ट्रीट लाईट असल्याने इतर भागात नेहमीच अंधार असतो. महिला व मुलांना संध्याकाळी घराबाहेर पडता येत नाही. या भागात नळ कनेक्शन नसून, नागरिकांना टँकरवर विसंबून रहावे लागत आहे. तर सध्या दहा ते पंधरा दिवसाआड टँकर येत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. रस्त्याच्या मध्ये पाईपलाइन टाकल्याने या भागात पाण्याचे टँकर येणे देखील बंद झाल्याने मोठा पाणी प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी संबंधित अधिकार्यांना सदर परिसरात नियोजन करुन पाण्याचे टँकर पाठविण्याचे सूचना केल्या. पाण्याचा प्रश्न तात्काळ न सोडविल्यास नगर-कल्याण महामार्गावर नागरिकांच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा युवा सेनेचे शहर जिल्हाप्रमुख पै. महेश लोंढे यांनी दिला आहे.