तर कॅन्सर जनजागृती अभियानातून कॅन्सरमुक्तीचा संदेश
कॅन्सरचे प्राथमिक अवस्थेत निदान आवश्यक -संजय गुगळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने अवतार मेहेरबाबा ट्रस्ट संचलित मेहेर हेल्थ सेंटरला गरजू रुग्णांसाठी मोफत विविध औषधांची मदत देण्यात आली. तर कॅन्सर जनजागृती अभियान राबविण्यात आले.
अवतार मेहेरबाबा यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाप्रसंगी जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे संजय गुगळे, डॉ. विनय शहा, जायंट्सच्या अध्यक्षा नूतन गुगळे, मेहेरबाबा ट्रस्टचे माजी व्यवस्थापक श्रीधर केळकर, विश्वस्त रमेश जंगले, डॉ. दहातोंडे, डॉ. दगडे, डॉ. कुलजीत कुमार, डॉ. जोशी, आदींसह आरोग्य कर्मचारी व परिचारिका उपस्थित होत्या.
संजय गुगळे म्हणाले की, कॅन्सरने घाबरण्याची गरज नसून, योग्य वेळी उपचार व तपासणी आवश्यक आहे. कॅन्सरचे प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास रुग्ण बरे होतात. मात्र भीतीपोटी लोक कॅन्सरला घाबरुन पळतात व मृत्यूच्या दाढेत अडकत असल्याचे त्यांनी सांगितले.
अवतार मेहेर बाबा ट्रस्ट संचलित मेहेर हेल्थ सेंटरच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमाला हातभार लावण्यासाठी जायंट्स ग्रुपच्या वतीने औषधांची मदत करण्यात आली. या कार्यक्रमात कॅन्सरची कारणे व कॅन्सर ओळखून त्याचा प्राथमिक अवस्थेत उपचार सुरु करण्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. तर कॅन्सर तज्ञ डॉ. सतीश सोनवणे लिखित पुस्तकांचे वाटप यावेळी करण्यात आले. अवतार मेहेर बाबा ट्रस्टचे वश्वस्त रमेश जंगले यांनी सामाजिक भावनेने जायंट्स ग्रुपने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.