शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्त्या अनिता लक्ष्मण काळे यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले.
सुभेदार मल्हारराव होळकर जयंती निमित्त शहरातील माऊली सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांच्या हस्ते काळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र तागड, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती दातीर, जिल्हा परिषद सहाय्यक प्रशासनाधिकारी शिवाजी भिटे, समाज कल्याण निरीक्षक तुकाराम सातपुते, मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, डॉ. श्रीकांत फाऊंडेशनचे उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत (काका) शेळके, उज्वला राजगुरू, शर्मिला नलावडे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जाडकर, विजय तमनर आदी उपस्थित होते.
अनिता काळे या भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालवून त्या सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करत आहे. तसेच जिल्हा परिषदेतील शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्याची मोहिम देखील सुरु केली आहे. महिला सक्षमीकरण व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांचे सातत्याने सुरु असलेल्या विविध उपक्रम व विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अनिताताई काळे यांनी मल्हारराव होळकर व अहिल्याबाई होळकर यांच्या इतिहासाला उजाळा दिला. तर जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन जेव्हा समाजकार्य निर्माण होते, तेव्हाच त्या व्यक्तीची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.