महिला व युवतींनी बनविले स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध 75 पकवान
प्रशिक्षकांचा सन्मान करुन, प्रशिक्षणार्थी महिलांना मार्केटिंगचे प्रशिक्षण
अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध परंपरा व संस्कृतीने नटलेल्या भारताच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाच्या जन शिक्षण संस्थेत विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेणार्या युवती व महिलांनी 75 पकवान बनवून त्याचे प्रदर्शन भरविले होते.
नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, अनिल तांदळे, माधुरी घाटविसावे, मंगल चौधरी, ममता गड्डम, रेणुका कोटा आदींसह प्रशिक्षिका व प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बाळासाहेब पवार म्हणाले की, आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक संस्कृतीत विविध खाद्य पदार्थांचा समावेश होतो. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 पकवान सादर करुन महिलांनी आगळा-वेगळा उपक्रम घेतला. जनशिक्षण संस्था सन 2005 पासून महिला व युवतींना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना पायावर उभे करण्याचे काम करत आहे. संस्थेच्या वतीने वर्षभर विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असून, अनेक महिला व युवतींनी प्रशिक्षण घेऊन स्वत:चे विविध व्यवसाय उभे केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कमल पवार यांनी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन, त्यांनी बनवलेल्या उत्पादनाच्या मार्केटगचे ज्ञान देखील दिले जात आहे. महिलांना चौफेर ज्ञान देऊन त्यांना समाजात स्वयंपुर्ण करण्याचे काम जनशिक्षण संस्था करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात महिलांनी मोदक, पुरणपोळी, मासवडी, पाणीपुरी, आमटी, शीरखुर्मा, ढोकळा, पराठे आदींसह विविध राज्याच्या खाद्य संस्कृतीचे दर्शन घडविले. उपस्थितांनी या खाद्यांचा आस्वाद घेतला. तसेच संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध भागात महिलांना व्यावसायिक शिक्षण देणार्या प्रशिक्षकांचा जामखेड येथे सुनंदाताई पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील प्रशिक्षणार्थी महिलांना विकास जाधव यांनी मार्केटिंगचे प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले. तसेच माय टिचर, माय हिरो हा सेल्फीचा उपक्रम राबविण्यात आला.