ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत चर्चा
कर्मचार्यांचे सेवा पुस्तक न भरल्यास ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकचा आंदोलनाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या प्रश्नावर बैठक घेण्यात आली. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
वर्गावर वसुली करताना ग्रामपंचायत कर्मचारीवर होणारे हल्ले, सेवा पुस्तक भरणे व इतर प्रश्न सोडविण्याचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकच्या वतीने शिंदे यांना देण्यात आले.
या बैठकित ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधी ग्रामपंचायत वेळेवर भरत नाहीत. किमान वेतन रक्कम 25 व 50 टक्के ग्रामपंचायत हिस्सा वेतन पोटीचा लवकर भरत नाहीत व 2007 पासून सुरू झालेला राहणीमान भत्ता अद्यापही अनेक ग्रामपंचायती देत नाही, ज्यांनी दिले ते अपूर्ण दिले असल्याचे प्रश्न उपस्थित करण्यात आला. पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कामगार याना ड्रेस कोड, टॉर्च, ग्लोज, गम पुरविण्यात येत नसल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या.
जिल्हा परिषदेत 10 टक्के नोकर भरती होणार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी निवृत्त झाल्यास त्यांच्या मुलांना नोकर भरतीत प्रथम प्राधान्य द्यावे. सिनियरटीनूसार वशिलेबाजी न करता नोकर भरती करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तर ग्रामपंचायत वसुली कराच्या नोटीस दिल्यावर वसुली करताना कर्मचारी वर्गावर नागरिक हल्ले करतात. त्यांना घरी जावून धमकावणे व मारहाण करण्याचे प्रकार घडत आहे. मात्र ग्रामपंचायत व ग्रामसेवक फारशी मदत करत नसल्याचा यावेळी आरोप करण्यात आला. हल्ले करणार्यांवर तातडीने गुन्हे दाखल होण्यासाठी ग्रामपंचायत विभागाने देखील पुढाकार घेण्याचे स्पष्ट करण्यात आले.
ग्रामपंचायत कर्मचार्यांचे सेवा पुस्तक भरले जात नसल्याचे या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकच्या वतीने राज्य उपाध्यक्ष व जिल्हा सेक्रेटरी अॅड.कॉ. सुधीर टोकेकर यांनी दिला. यावेळी इतर संघटनेच्या पदाधिकारी यांनी देखील विविध प्रश्न मांडले. ग्रामपंचायत कर्मचारी आयटकचे राज्य पदाधिकारी कॉ. मारुती सावंत यांनी विविध प्रश्नावर बैठकित लक्ष वेधले. यावेळी ऑफिस अधीक्षक उंडे, गटविकास अधिकारी जाधव उपस्थित होते.
