रिपाईने घेतली जिल्हाधिकारी यांची भेट
गो हत्येच्या कायदेशीर कारवाईचे समर्थन करुन, जनावरे खरेदी-विक्री करणार्यांवर अत्याचार थांबविण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरक्षकाच्या नावाखाली कायदा हातात घेऊन दहशत माजविणार्यांना आवर घालण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. तर गो हत्या करणार्यांवर कायदेशीर कारवाईचे समर्थन करुन, कायदा हातात घेऊन गाय, बैल व म्हैस खरेदी विक्रीसाठी घेऊन जाणार्यांवर होत असलेल्या अत्याचार व कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, विजय शिरसाठ, संतोष पाडळे, संदीप वाकचौरे, अभिजीत पंडित, आदिल शेख, जावेद सय्यद, हुसेन चौधरी, जमीर इनामदार, सुजीत घंगाळे, नईम इनामदार, एजाज कुरेशी, नईम शेख, अझीम खान, अल्ताफ कुरेशी आदींसह रिपाई व कुरेशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गो हत्या बंदी कायद्यानुसार पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यामध्ये गोरक्षकाच्या नावाखाली अनेक दिवसापासून दहशत अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. खरेदी विक्री करता गाय, बैल व म्हशी ही जनावरे खरेदी अथवा विक्री करुन घेऊन जाताना कोणतीही शहानिशा न करता कारवाई होत आहे. यावर पोलीस प्रशासनापेक्षा हिंदुत्ववादी संघटना परस्पर कायदा हातात घेऊन वाहने अडवून त्यांना मारहाण करीत आहे. यामध्ये अनेक वाहने पेटवून दिल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

नुकतेच 3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथील घोडेगाव बाजारातून जनावरे खरेदी विक्रीसाठी घेऊन जात असताना नगर-औरंगाबाद रोड टोलनाका येथे काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहन अडवून जावेद इनामदार या व्यक्तीला जबर मारहाण केली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे. सदर व्यक्ती जनावरे घेऊन जात असलेल्या खरेदीच्या पावत्या देखील होत्या. त्यामध्ये म्हशी होत्या, ती जनावरे कत्तलसाठी नव्हत्या. त्या शेतकर्यांनाच विकल्या जाणार होत्या. त्याबाबत सर्व माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांना देऊनही दबावापोटी मारहाण झालेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर व्यक्तीकडे खरेदी विक्रीचे लायसन, जनावरांचे खरेदीचे पावत्या, वाहनांचे सर्व कागदपत्रे असून देखील हा गुन्हा दाखल कोणत्या सबबीवर दाखल झाला असल्यचा प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.
गाय, बैल यांची कत्तल होत असल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. बेकायदेशीर कृत्य व अवैध धंद्यावर कारवाई करण्याचा अधिकार फक्त पोलीसांना आहे. मात्र हा अधिकार हिंदुत्ववादी संघटनांना कोणी दिला?, गोरक्षक म्हणून कायदा हातात घेतला जात आहे. वाहने अडवून त्यांना मारहाण करण्याची पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी दिली आहे का? हे प्रश्न उपस्थित करुन अशा प्रकारामुळे लोकशाही संपून आराजकता व हुकुमशाही निर्माण होणार असल्याचे म्हंटले आहे. तर या प्रकरणात पोलीस संपूर्णत: दुर्लक्ष करीत असून, यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव जाण्याचा धोका असल्याचे म्हंटले आहे. असा प्रकार पुन्हा घडल्यास प्रशासनाच्या विरोधातच उपोषण करण्याचा इशारा रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
