कोसेगव्हाण गावाच्या आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
गावगुंडाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- गायरान जमीनी खाली करण्यासाठी त्रास देणार्या गावगुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मौजे कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. गावातून हाकलून लावण्यासाठी धमकाविणे, महिलांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी सदरील गावगुंडाविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, मेजर राजू शिंदे, गणेश बागल, हौसराव गोरे, गौतम गोरे, कांतीलाल माळी, उत्तम गोरे, मोहन घोलवड, महिला आघाडीच्या वैजयंत घोलवड, सोमनाथ गोरे, काशिनाथ बर्डे, शरद गोरे, वैभव गोरे, सुरेश माळी, भाऊसाहेब गोरे, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.
मौजे कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा) येथे वीस ते पंचवीस आदिवासी भिल्ल समाजाचे कुटुंबीय गायरान जमीनी मागील वीस वर्षापासून कसत आहे. मोलमजुरी व शेती करुन ते आपला उदरनिर्वाह चालवित आहे. मात्र काही गावगुंडांनी सदर जागा बळकाविण्यासाठी आदिवासी भिल्ल समाजाला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. जमीन खाली न केल्यास खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी गावगुंडांकडून धमल्या दिल्या जात आहे. तर आंदोलनाचे इशारे देऊन पोलीसांवरती दबाव टाकला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गावामध्ये राहत असताना संबंधित गावगुंडांकडून दमदाटी केली जात असून, गावातून हाकलून लावण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप आदिवासी भिल्ल समाजाच्या तक्रारदारांनी केला आहे. गायरान जमीनीवर राहणार्यांचे कोणतेही अवैध धंदे नाहीत. सर्व समाज गरीब असल्याने गावगुंड दहशतीने जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करत आहे. महिला पाणी आनण्यासाठी गेले असता, त्यांना शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत आहे. 28 मार्च 2022 रोजी सदर गावगुंडांनी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत आदिवासी भिल्ल समाजाला हाकलून लावण्याचा ठराव घ्या, असे म्हणत होते. हा ठराव न दिल्यास भिल्लांना उगडे-नागडे करुन मारण्याचे व गावाच्या यात्रेत ठोकून काढण्याचे सांगितले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या गावगुंडांमुळे सर्व आदिवासी भिल्ल समाजामध्ये दहशत पसरली असून, सर्व महिला देखील भितीच्या वातावरणाखाली वावरत आहे. संबंधित गावगुंडांवर गुन्हे दाखल करुन पोलीस संरक्षण देण्याची मागणी मौजे कोसेगव्हाण येथील आदिवासी भिल्ल समाजाने केली आहे. अन्यथा 13 एप्रिल पासून श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.