• Fri. Jan 30th, 2026

ख्रिस्ती समुदायावर होणारे हल्ले थांबवा

ByMirror

Jan 24, 2023

ख्रिश्‍चन एकता मंचची मागणी

धर्मांतराच्या खोट्या आरोपाखाली चर्चमध्ये धर्मगुरुंना होणारी मारहाण व दाखल होणार्‍या खोट्या गुन्ह्याबाबत वेधले लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समुदायावर होणारे हल्ले थांबवून त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचार थांबविण्याची मागणी ख्रिश्‍चन एकता मंचच्या वतीने करण्यात आली. तर धर्मांतराच्या खोट्या आरोपाखाली चर्चमध्ये धर्मगुरुंना होणारी मारहाण व दाखल होणार्‍या खोट्या गुन्ह्याबाबत लक्ष वेधण्यात आले.

ख्रिस्ती संविधानिक हक्क आंदोलनाच्या माध्यमातून ख्रिश्‍चन एकता मंचचे जिल्हाध्यक्ष प्रा. संदिप वाघमारे व युवा जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी रेव्ह. प्रकाश बनसोडे, रेव्ह. जे.आर. वाघमारे, सुशांत म्हस्के, शशिकला साळुंखे, अभिजीत पंडित, तुषार पठारे, संतोष पाडळे, आशुतोष वाघमारे, संदीप शिरसाठ, अरुण अब्राहम, प्रशांत पगारे, पास्टर अजय पंडित, रोहन कानडे, अजय खरात, आदिल शेख, अंकिता धोत्रे, गुलामअली शेख आदी उपस्थित होते.


देशातील विविध राज्यामध्ये खिश्‍चन समाजावर हेतुपुरस्पर अन्याय होत आहे. विशेष करुन कर्नाटक, मध्यप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये नाताळ सणाच्या दिवशी हल्ले करण्यात आले. यामध्ये धर्मगुरुंना मारहाण करण्यात आली. तर बायबल व अन्य धार्मिक सामग्री जाळण्यात आली. चर्चमध्ये लोक, माता-भगिनी प्रार्थना व भक्ती करण्यासाठी आले होते. त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. देशातील रविवारी सर्व चर्चमध्ये भक्ती व प्रार्थना केली जाते. दर रविवारी होणार्‍या भक्ती आराधनेमध्ये समाजकंटक व्यतय आणून त्या बंद केल्या जात आहे. धर्मांतर करण्याचा आरोप लावून धर्मगुरुंवर खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


ख्रिश्‍चन समाजाचे संविधानिक धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करावे, चर्चमधील भक्ती, आराधनेमध्ये होणारी गुंडागर्दी थांबविण्यासाठी राज्य सरकारांना निर्देश द्यावे, चर्चमध्ये मारहाण व तोडफोड करणार्‍यांविरोधात कठोर कायदा करावा, धर्मगुरुंवर धर्मांतर करण्याचे दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्यावे, चर्चवर हल्ले करणार्‍या जातीवादी संघटनेवर बंदी घालण्याची मागणी ख्रिश्‍चन एकता मंचच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *