• Sat. Sep 20th, 2025

कोठला येथे भर रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करा

ByMirror

Feb 28, 2023

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन

वाहतूक कोंडी व लहान-मोठ्या अपघातांचा नागरिकांना त्रास

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोठला येथील राज चेंबर्ससमोर भर रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसमुळे वाहतुक कोंडीचा नागरिकांना नेहमी त्रास सहन करावा लागत असून, अपघातालाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे याठिकाणी थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने अन्सार सय्यद यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दीड महिन्यापूर्वी सदर मागणीचे निवेदन शहर वाहतुक शाखेला देखील देण्यात आले होते. परंतु अपेक्षित कारवाई होत नसल्याने भर रस्त्यावर उभ्या असणारे खाजगी बसेसवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व शहर वाहतुक शाखेच्या वतीने संयुक्त कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.


कोठला स्टॅन्ड जवळील राज चेंबर्स येथील ट्रॅव्हल्स ऑफिस समोर मुख्य रस्त्यावर खाजगी लक्झरी बसेस बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जातात. तसेच बसच्या डिक्कीमध्ये आणलेला माल देखील रस्त्यावरच उतरविला जातो. शहरातील उड्डाणपूल ज्या ठिकाणी संपतो तेथे डीएसपी चौकाकडे जाणार्‍या ठिकाणी उतार असल्यामुळे वाहने भरधाव वेगाने येतात.

कोठला येथे मोठा चौक असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. वर्दळीच्या वेळेत या खासगी लक्झरी बसेस ट्रॅव्हल्स ऑफिस समोर भर रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून, या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात होतात. तसेच वाहतूक कोंडी देखील होत असल्याने नागरिकांना व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


काही लक्झरी बसेस तर चुकीच्या दिशेने उभ्या असतात. या उभ्या असलेल्या खासगी बसेसमुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे त्वरीत या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोठला येथील राज चेंबर्स समोर भर चौकात व रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसेसवर कठोर कारवाई करावी. सदर ठिकाणी लक्झरी बसेसला थांबण्यास कायमस्वरूपी मनाई करावी व त्यांना शहराबाहेर थांबा देण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *