महिलांनी महिलांसाठी आरोग्य चळवळ उभी करावी -डॉ. शिल्पा पाठक
अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी महिला स्वत:कडे दुर्लक्ष करत असल्याने महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे. महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असून, आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम व सकस आहाराकडे वळण्याची गरज बनली आहे. तर वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन गंभीर आजारांचे धोके टाळण्याचे आवाहन स्त्री रोग तज्ञ डॉ. शिल्पा पाठक यांनी केले.
केडगाव येथील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त साई स्पर्श मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिराप्रसंगी डॉ. पाठक बोलत होत्या. यावेळी डॉ. राकेश थोरात, हॉस्पिटलचे डॉ. अमोल जाडकर, डॉ. संतोष राहिंज, सोमनाथ वाघ, विरेंद्र लोखंडे, सागर ढगे, अकाश सातपुते आदी उपस्थित होते.
पुढे डॉ. पाठक म्हणाल्या की, महिलांनी महिलांसाठी आरोग्य चळवळ उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे समाज निरोगी होणार असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी महिलांच्या मासिक पाळी, ओटी-पोट दुखणे, अंगावर पांढरे जाणे, पूर्व प्रसूती पश्चात तपासणी, वंध्यत्व निवारण अशा अनेक आरोग्य विषयावर महिलांना मार्गदर्शन केले.
या शिबिराला केडगाव परिसरातील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. गरजू महिलांना पुढील उपचारासाठी विशेष सवलत देण्यात आली.