• Fri. Jan 30th, 2026

के.के रेंज मधील चित्तथरारक युद्धसरावाचा थरार पाहून विद्यार्थी भारावले

ByMirror

Jan 16, 2023

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्यक्ष रणगाडे… धडाडणार्‍या तोफा….बरसणारे तोफगोळे… बंदुकीतून निघणार्‍या शेकडो गोळ्या … बॉम्बचा वर्षाव.. सैनिकांचा जोश.. लष्कराचे शिस्तबद्ध नियोजन याचा अनुभव म्हणजे के. के रेंजचा लष्कराचा पावर डेमो. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीच्या निमित्ताने हा प्रत्यक्ष युद्धसराव पाहण्याचा योग आला.


सकाळच्या गुलाबी थंडीचा अतिशय आनंदाने आस्वाद घेत सकाळी 7 वाजता विद्यार्थी शालेय प्रांगणात एकत्र आले. गुलाबी थंडीत कुडकुडत एकत्र जमणारी मुले गप्पा-गोष्टी, गाण्यांच्या भेंड्या खेळत संस्थेच्या बसमधून प्रवासास सुरुवात झाली. सोबतच असलेले शिक्षक सतिश गुगळे यांनी अहमदनगर शहराच्या इतिहासाविषयी प्रवासात माहिती सांगितली.

के.के रेंजच्या पायथ्याशी चेक पोस्टचा अनुभव मुलांनी घेतला. सोबतच विळद घाटात रेल्वे मालगाडी जवळून पाहण्याचा अनुभव देखील मुलांना मिळाला. निसर्ग, झाडी, डोंगर पाणी न्याहाळत विद्यार्थी प्रत्यक्ष के.के. रेंजच्या युद्ध सराव भूमीवर पोहोचले. देशभक्तीने भारावलेले वातावरणात, लष्कराचे शिस्तबद्ध नियोजन, उत्तम व्यवस्था सोबत छान नाश्ता करून मुले सुखावली.


माईकवर उद्घोषणा झाली आणि क्षणात हृदयाचा ठोका चुकवणारी रणगाड्यांची फायरिंग विलक्षण अविस्मरणीय आठवण मनात करुन गेली. युद्ध साहित्याचे प्रदर्शन तोफा, मिसाईल, रॉकेट लॉन्चर, रडार यंत्रणा, रणगाड्यावर चढण्याचा अनुभव हे सर्व पाहिल्यानंतर बालमनामध्ये सैनिकाविषयी आदरभाव निर्माण झाला आणि परतीच्या प्रवासाला सुरवात झाली.


वाटेतच अडसुरे कुटुंबियांच्या फार्म हाऊसमध्ये जेवणाची पंगत रंगली. एकमेकांना खाऊ देताना मुलांमधील सहकार्याची भावना पाहून मन तृप्त झाले. वाटेत विखे पाटील फाऊडेशन मधील भव्य सोलर लाईट प्रकल्प पाहून अपारंपारिक ऊर्जेबद्दलच्या ज्ञानात अधिकच भर पली. ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांच्या मनामनात देशप्रेमाचे बीज पेरणारी ठरली. या उपक्रमासाठी अ.ए. सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्या सुषमा चिटमिल, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, रविंद्र शिंदे, आशा सातपुते यांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *